आंद्रोस टाऊनसेंड आणि रॉबटरे सोल्डाडो यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर टॉटनहॅमने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत अ‍ॅस्टॉन व्हिलावर २-० असा विजय मिळवला. नुकत्याच झालेल्या २०१४ फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या २२ वर्षीय टाऊनसेंडने अ‍ॅस्टॉनसाठीही महत्त्वपूर्ण गोल केला. ३१व्या मिनिटाला क्रॉसवर सुरेख गोल करत टाऊनसेंडने टॉटनहॅमचे खाते उघडले. अ‍ॅस्टॉन व्हिलाच्या बचावपटूंनी शिताफीने खेळ करत टॉटनहॅमच्या आघाडीपटूंना रोखून धरले होते. टाऊनसेंडने चतुराईने खेळ करत हा बचाव भेदला आणि टॉटनहॅमला पहिले यश मिळवून दिले. यानंतर ६९व्या मिनिटाला रॉबटरे सोल्डाडोने गोल करत टॉटनहॅमला शानदार विजय मिळवून दिला. या विजयासह टॉटनहॅमने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे. पॉल लॅम्बर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या अ‍ॅस्टॉन व्हिलाच्या संघासाठी हा चार सामन्यांतला पहिला पराभव आहे. या पराभवासह अ‍ॅस्टॉन व्हिलाची तेराव्या स्थानी घसरण झाली आहे. लीग चषकाच्या सामन्यात टॉटनहॅमने त्यांचा ४-० असा धुव्वा उडवला होता. त्या तुलनेत अ‍ॅस्टॉन व्हिलाने या सामन्यात पराभवाचे अंतर कमी करत प्रगती केली आहे.

Story img Loader