‘‘खेळाचा आनंद लुटा, स्वप्ने पाहा, त्यांचा पाठलाग करा, ती साकार होतात!’’.. असे उद्गार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १६ मार्च २०१२ या दिवशी मिरपूरमध्ये आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध महाशतक साजरे केले तेव्हा काढले होते. चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा जिंकल्यावर मात्र त्याने माझी सर्व स्वप्ने साकार झाली आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
लहान असताना सचिनने भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यानंतर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचे, त्यानंतर विश्वविजयाचे आणि आयपीएल जेतेपदाचे. ही सर्व स्वप्ने त्याची पूर्ण झाली आहेत. या वर्षीचा दुग्धशर्करा योग म्हणजे सचिनच्या मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धा तर जिंकलीच, पण त्याचबरोबर चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत राजस्थानवर विजय मिळवल्यावर ‘ड्रेसिंग रूम’मध्ये सर्वात जास्त आनंदात सचिनच दिसत होता.
चॅम्पियन्स लीग जिंकल्यावर सचिनला विचारले की, आता तुझे नवीन स्वप्न काय, यावर तो म्हणाला की, ‘‘कसोटीमध्ये अव्वल स्थानावर जाण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यानंतर विश्वचषकाला गवसणी घालायचे स्वप्न होते, ही दोन्ही स्वप्ने पूर्ण झाली. त्यानंतर आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, या वर्षी ही दोन्ही स्वप्ने पूर्ण झाली. आताच्या घडीला माझी सर्व स्वप्ने साकार झाली आहेत.’’
या वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएलबरोबर चॅम्पियन्स लीगचेही जेतेपद पटकावले, याबाबत विचारल्यावर सचिन म्हणाला की, ‘‘अप्रतिम, आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग एकाच वर्षी जिंकणे ही खास बाब आहे. आयपीएलच्या सुरुवातीला आमची कामगिरी चांगली होत नव्हती, पण काही सामन्यांनंतर आम्ही लयीत आलो आणि सरतेशेवटी आम्ही जेतेपदे पटकावली.
चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने कारकिर्दीतील ५० हजार धावा पूर्ण केल्या. याबद्दल सचिन सांगतो, ‘‘मी हा मैलाचा दगड गाठला आहे, हे माझ्या ध्यानीही नव्हते. मैदानातील मोठय़ा पदडय़ावर कारकिर्दीत ५० हजार धावा पूर्ण करण्यासाठी दोन धावा हव्या असल्याचे मी पाहिले, तेव्हा मला हे समजले. हे सारे मला अनपेक्षित होते, माझ्यासाठी हा एक सुखद, आनंददायी धक्का होता. आतापर्यंतच्या प्रवासात मी बरीच आव्हाने पेलताना त्याचा आनंद लुटला आहे. आतापर्यंत कधी कारकिर्दीत चढ, तर कधी उतार आला, पण हा प्रवास अप्रतिम होता.’’
सचिनवर त्याचे चाहतेच नाही, तर त्याचे प्रतिस्पर्धीही स्तुतिसुमनांचा वर्षांव करतात. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टिन लँगरने ‘शॉर्ट लेग’ला क्षेत्ररक्षण करत असताना सचिनची फलंदाजी पाहिली, त्या वेळी सचिनभोवती एक वलय असल्याचे त्याला जाणवले. याबाबत फलंदाजी हे तुझ्यासाठी ध्यानधारणेसारखे आहे का, असे विचारल्यावर तो म्हणाला की, ‘‘मला माहिती नाही. फलंदाजी करताना मी निराळ्याच विश्वात रममाण होतो. आजूबाजूला कोण क्षेत्ररक्षण करत आहे, हे जाणवत नाही. त्या वेळी जे मनात ठरवले आहे ते करण्यासाठी चित्त एकाग्र झालेले असते. चेंडूला जेवढय़ा जवळून पारखता येईल, तेवढा पारखून त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम मी करत असतो.’’
सचिनबरोबरच राहुल द्रविडनेही ट्वेन्टी-२० लीग स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली, राहुलबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, ‘‘त्याच्याबद्दल कमी शब्दांत बोलायचे झाले तर तो खराखुरा ‘चॅम्पियन’ आहे. तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक दर्जेदार खेळाडू आहे, एक असा सर्वोत्तम खेळाडू की, ज्याच्याबरोबर आणि ज्याच्याविरुद्ध खेळायची संधी मला मिळाली. मी जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटलो तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या खेळात नजाकत होती आणि त्याची खेळी पाहताना आनंद यायचा. अप्रतिम कारकिर्दीबद्दल मी त्याला धन्यवाद देतो.’’
यापुढे तू मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळताना दिसणार नाहीस, पण त्यांना तू मार्गदर्शन करणार आहेस का, असे विचारल्यावर सचिन म्हणाला की, ‘‘आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटला आणि जेतेपद पटकावले. यापुढे मी कोणती जबाबदारी सांभाळेन हे आताच सांगणे उचित ठरणार नाही, पण मी मुंबई इंडियन्सबरोबर सहा वर्षे करारबद्ध असल्याने पुढच्या मोसमाची मी वाट पाहत आहे.’’

भविष्यातही मुंबई इंडियन्ससोबत कायम राहण्याचे सचिनचे संकेत
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सकडून सचिन तेंडुलकर भलेही शेवटची चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळला असेल पण आयपीएलच्या पुढील मोसमात मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचा भाग असणार असल्याचे संकेत सचिनने दिले आहेत. याविषयी विचारले असता सचिन म्हणाला, ‘‘सध्या तरी याचा मी विचार केला नाही. आम्ही नुकतीच चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आहे. त्याचाच आनंद मी लुटणार आहे. आयपीएल स्पर्धेला अद्याप सहा महिने आहेत. त्यामुळे तोपर्यंत माझी भविष्यातील भूमिका स्पष्ट होईल, अशी आशा आहे. गेली सहा वर्षे मी मुंबई इंडियन्सचा भाग असल्यामुळे या संघासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. मुंबई इंडियन्ससोबतचा अनुभव फारच मजेशीर होता.’’

Story img Loader