कोलोन (जर्मनी) : सामन्याच्या ७३व्या सेकंदाला युरी टिलेमन्स आणि सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्णधार केव्हिन डीब्रूएनेने केलेल्या गोलमुळे बेल्जियम संघ युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आला. बेल्जियम संघाने राजघराण्यातील व्यक्तींसमोर खेळताना रोमेनियाचा २-० असा पराभव केला. बेल्जियमच्या विजयामुळे इ-गटातून बाद फेरीसाठी कमालीची चुरस निर्माण झाली असून, चारही संघांचे तीन गुण आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलोनमध्ये हा सामना कमालीच्या विस्मयकारक वातावरणात झाला. दोन्ही गोलच्या वेळी बेल्जियमच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की रोमानियाच्या बचाव फळीला काही कळायच्या आत चेंडू गोलजाळीत गेला होता. बेल्जियमचे राजे फिलिपे आणि राणी मथिल्डे या सामन्यासाठी उपस्थित होत्या. बेल्जियमच्या विजयानंतर आता या गटातील अखेरच्या सामन्यांना फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अखेरच्या सामन्यात जो जिंकेल, तो बाद फेरी गाठेल अशी परिस्थिती आहे. रोमेनिया आणि बेल्जियम यांचा गोलफरक एकचा आहे. स्लोव्हाकियाचा गोलफरक शून्यावर आहे, तर युक्रेनचा फरक -२ आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचे आव्हान केवळ मोठ्या विजयावर अवलंबून असेल.

हेही वाचा >>> Eng vs USA T20 World Cup: इंग्लंड सेमी फायनलमध्ये; ख्रिस जॉर्डनची हॅट्ट्र्रिक

लुकाकूची पाटी कोरी राहिली असली, तरी त्याने सुरुवातीलाच रचलेल्या चालीवर टिलेमन्स गोल करू शकला. पूर्वार्धात रोमेनियाने अशीच वेगवान सुरुवात केली. मात्र, त्यांना गोल करता आले नाहीत. कधी त्यांचे फटके गोलपोस्टच्या बाहेर गेले, तर कधी गोलरक्षकाने त्यांच्या आक्रमकांना रोखले. उत्तरार्धात स्थिरावल्यानंतर बेल्जियमने वर्चस्व राखायला सुरुवात केली. कर्णधार डीब्रूएनेचे लागोपाठ तीन प्रयत्न अपयशी ठरले. त्याच्या फटक्यांना वेग होता, पण ताकदीचा अभाव दिसून आला. परंतु सामना संपण्यास दहा मिनिटे शिल्लक असताना डी ब्रूएनेच्या भन्नाट गोलने बेल्जियमचा विजय सुनिश्चित झाला.

विजय आवश्यकच…

पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागल्यावर बेल्जियम संघावर बरीच टीका होत होती. याचे वेगळे दडपण त्यांच्या खेळाडूंवर होते. ‘‘आम्हाला काय करायचे हे ठाऊक होते. विजय आवश्यकच होता. अन्यथा आम्हाला घरचा रस्ता धरावा लागला असता. संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करत राहण्यास मी सज्ज आहे,’’ असे डी ब्रूएने म्हणाला. डी ब्रूएनेची विश्वातील सर्वोत्तम मध्यरक्षकांमध्ये गणना केली जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Euro 2024 belgium open account with 2 0 win over romania zws