कोलोन : इंग्लंड संघाला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यातही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला स्लोव्हेनियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांत पाच गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले असले, तरी त्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागत आहे. गुणवान आक्रमकपटूंचे बरेच पर्याय उपलब्ध असूनही सावध पवित्रा राखल्यामुळे इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट टीकेचे धनी ठरत आहेत.

यंदाच्या युरो स्पर्धेत केवळ एक विजय आणि दोन सामन्यांत बरोबरी अशी कामगिरी राहिल्यानंतर इंग्लंड संघाच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तीनही सामन्यांत त्यांना कामगिरी उंचावता आली नाही. स्लोव्हेनियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडने चेंडूवर दीर्घकाळ ताबा राखला, पण त्याचा उपयोग करून घेण्यात ते सपशेल अपयशी ठरले. सावध खेळामुळे त्यांनी उपस्थित प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला. सामन्यानंतर इंग्लंडच्या पाठीराख्यांनी मैदानात मद्याचे रिकामे ग्लास फेकून आपला असंतोष व्यक्त केला. इंग्लंडचा अखेरच्या साखळी सामन्यापूर्वीच बाद फेरीतील प्रवेश निश्चित होता. मात्र, या बरोबरीने स्लोव्हेनियाही क-गटातून बाद फेरीत दाखल झाले.

हेही वाचा >>> SA vs AFG Semi Final 1 Live:दक्षिण आफ्रिका ‘चोकर्स’ टॅग पुसणार का अफगाणिस्तान इतिहास घडवणार? रोमांचक लढतीचे लाइव्ह अपडेट्स

इंग्लंडने बाद फेरी गाठण्यावरून चाहते समाधानी असले, तरी ते संघाच्या एकूण कामगिरीवर नाराज होते. ‘‘ते माझ्यावर खूश नाहीत, हे सत्य आहे. मी त्यांच्यापासून पळणार नाही. आता बाद फेरीत आम्हाला त्यांच्या प्रोत्साहनाची गरज आहे,’’ असे सामन्यानंतर प्रशिक्षक साऊथगेट म्हणाले.

इंग्लंड आता बाद फेरीत तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम चार संघांपैकी एका संघाविरुद्ध खेळेल. मात्र, ५८ वर्षे एका मोठ्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या इंग्लंड संघाला स्लोव्हेनियासारख्या तुलनेने दुबळ्या संघाविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागल्याने त्यांची चिंता वाढली आहे. इंग्लंड संघातील आक्रमक खेळाडूंच्या क्षमतेविषयी शंका घेतली जाऊ लागली आहे.

स्लोव्हेनियाविरुद्ध इंग्लंडला लय मिळवण्यासाठी २० मिनिटे लागली. त्या वेळी केलेला गोलही ‘ऑफसाइड’मुळे अपात्र ठरविण्यात आला. उत्तरार्धात इंग्लंडने कोल पाल्मर, कोबी मेइनू आणि ट्रेंट अॅलेक्झांडर-आर्नोल्ड यांना मैदानावर उतरवले. त्यांना सामन्यावर सकारात्मक प्रभाव पाडला, इंग्लंडला गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. अखेरपर्यंत असाच निराशाजनक खेळ कायम राहिला आणि सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या सामन्यातील एका गुणाने स्लोव्हेनिया सर्वोत्कृष्ट तिसरा संघ म्हणून बाद फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.

डेन्मार्कची सलग तिसरी बरोबरी

म्युनिक : सामन्यातील बरोबरीही आपल्याला बाद फेरीत नेण्यास पूरक असल्याचे माहीत असल्यामुळे डेन्मार्कने युरो अजिंक्यपद स्पर्धेत सर्बियाविरुद्ध कमालीचा सावध खेळ केला. अखेर डेन्मार्क आणि सर्बिया यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. साखळी फेरीतील तीनही सामने बरोबरीत सोडवणाऱ्या डेन्मार्कसमोर बाद फेरीत आता बलाढ्य जर्मनीचे आव्हान असेल. तीन सामन्यांत गोलजाळीच्या दिशेने सर्वाधिक फटके मारून, चेंडूचा सर्वाधिक ताबा मिळवूनही डेन्मार्क संघ स्पर्धेत एकही विजय मिळवू शकला नाही.

बेल्जियम, रोमानिया, स्लोव्हाकिया बाद फेरीत

स्टुटगार्ट : उत्तरार्धाच्या सुरुवातीला आणि अगदी अखेरच्या क्षणाला युक्रेनची धारदार आक्रमणे रोखत बेल्जियमने युरो स्पर्धेत बुधवारी झालेला सामना गोलशून्य बरोबरीत सोडवला. या बरोबरीमुळे बेल्जियमने इ-गटातून दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला चांगला खेळ करता आला नाही. कर्णधार केव्हिन डी ब्रूएनेचे अनेक प्रयत्न फोल ठरले. त्याच वेळी फ्रँकफर्ट येथे रोमानिया आणि स्लोव्हाकिया सामना १-१ असा बरोबरीत राहिला. सामन्याच्या २५व्या मिनिटाला डुडाने हेडर करत स्लोव्हाकियाला आघाडीवर नेले. रझवान मरिनने पूर्वार्धातच पेनल्टीवर रोमानियाला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धातही हीच परिस्थिती कायम राहिली आणि रोमानिया अव्वल स्थानाने बाद फेरीत गेले. स्लोव्हाकियानेही आगेकूच केली.