म्युनिक : युरोपीय फुटबॉलमधील महासत्ता मानल्या जाणाऱ्या स्पेन आणि फ्रान्स या संघांमध्ये युरो अजिंक्यपद स्पर्धेत आज, बुधवारी उपांत्य फेरीची लढत होणार आहे. त्यामुळे ही लढत म्हणजे, युरोपीय वर्चस्वाची लढाईच असेल. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा स्पेन संघ आपले सातत्य राखण्यासाठी सज्ज असेल, तर फ्रान्सचा आक्रमणाला अधिक धार आणण्याचा प्रयत्न असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या युरो स्पर्धेत स्पेनने सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली आहे. स्पेनने आतापर्यंत ११ गोल केले आहेत. फ्रान्सला मात्र केवळ पेनल्टीवरील एक गोल आणि प्रतिस्पर्ध्यांकडून झालेल्या दोन गोलचा (स्वयंगोल) आधार मिळाला आहे. त्यानंतरही फ्रान्सचा संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे.

युवा खेळाडूंच्या क्षमतेवर स्पेनची वाटचाल सुकर राहिली आहे. त्याच वेळी फ्रान्स संघ मात्र लय मिळवण्यासाठी धडपडत आहे. कर्णधार किलियन एम्बापेला सूर गवसेला नाही. नाकाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मास्क घालून खेळावे लागत आहे. या बदलाशी तो अजून जुळवून घेऊ शकलेला नाही.

उपांत्यपूर्व फेरीत मिकेल मेरिनोने अतिरिक्त वेळेत अगदी अखेरच्या क्षणी मारलेल्या गोलमुळे स्पेनने जर्मनीवर विजय मिळवला, तर फ्रान्सला पोर्तुगालविरुद्ध पेनल्टी शूट-आऊटपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

हेही वाचा >>> भारतीय संघाला बक्षिस जाहीर होताच बॅटमिंटनपटू चिराग शेट्टीचा महाराष्ट्र सरकारवर आरोप; म्हणाला…

युरो स्पर्धेत स्पेन चौथ्या, तर फ्रान्स तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहेत. यंदाच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सर्व सामने जिंकणारा स्पेन हा एकमेव संघ असून, फ्रान्सला साखळी फेरीत केवळ ऑस्ट्रियावर विजय मिळवता आला. पोलंड आणि नेदरलँड्सविरुद्धचे त्यांचे सामने बरोबरीत राहिले. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बेल्जियमवर एका गोलने विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यातही पोर्तुगालविरुद्ध नियमित आणि अतिरिक्त वेळेत त्यांना एकही गोल करता आला नाही.

जर्मनीविरुद्धच्या नाट्यपूर्ण लढतीची किंमत स्पेनला मोजावी लागली आहे. त्यांचे तीन प्रमख खेळाडू उपांत्य सामन्यात खेळू शकणार नाहीत. यामध्ये पेड्री, डॅनी कार्वाहल आणि रॉबिन ले नॉर्मंड यांचा समावेश आहे. जर्मनीविरुद्ध गुडघ्याच्या दुखापतीमुळे पेड्रीला आठव्या मिनिटालाच बाहेर पडावे लागले. आक्रमक बचावपटू म्हणून लोकप्रिय असलेल्या कार्वाहलला जर्मनीच्याविरुद्ध अगदी अखेरच्या क्षणाला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे तो या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. नॉर्मंड स्पर्धेतील दुसऱ्या पिवळ्या कार्डमुळे फ्रान्सविरुद्ध खेळू शकणार नाही. फ्रान्स संघासाठी मात्र अशी कुठलीही अडचण नाही.

स्पेनची रॉड्री, फ्रान्सची एम्बापेवर भिस्त

लामिन यामल आणि निको विल्यम्स हे युवा खेळाडू स्पेनची ताकद आहेत. मात्र, उपांत्य फेरीतील दडपण हाताळण्यासाठी अनुभवी मध्यरक्षक रॉड्रीची भूमिका महत्त्वाची ठरेल. बचावपटू डॅनी कार्वाहल उपलब्ध नसल्याने स्पेनला हेसूस नवासवर अवलंबून राहावे लागेल. त्याच्यासमोर एम्बापे, ओस्मान डेम्बेले आणि बार्कोला या फ्रान्सच्या वेगवान खेळ करणाऱ्या आक्रमकांना रोखण्याचे आव्हान असेल. फ्रान्सची भिस्त एम्बापेवरच असेल. फ्रान्सकडे एन्गोलो कान्टे, चुआमेनी, कॅमाविंगा, अॅन्टोन ग्रिझमन, कोलो मुआनी अशी तगडी फळी आहे. त्यामुळे या सामन्यात सर्वच आघाड्यांवर चुरस पाहायला मिळेल.

स्पेनफ्रान्सबाबत…

● स्पेन आणि फ्रान्समध्ये आतापर्यंत ३६ सामने. स्पेनचे १६, तर फ्रान्सचे १३ विजय.

● स्पेन सहाव्यांदा युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. यामध्ये एकदाच (२०२० मध्ये) अंतिम फेरी गाठण्यात अपयश.

● फ्रान्स पाचव्यांदा उपांत्य फेरीत. यात तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यश.

● गेल्या चारपैकी तीन मोठ्या स्पर्धांत फ्रान्स अंतिम फेरीत. एकदा विजेतेपद. युरो २०१६ मध्ये पोर्तुगालविरुद्ध हार, २०१८ च्या विश्वचषकात क्रोएशियावर मात, २०२० विश्वचषकात अर्जेंटिनाकडून पराभूत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Euro 2024 spain vs france semi final match preview zws
Show comments