वृत्तसंस्था, गेल्सेनकिर्चेन
ख्रिास्तियानो रोनाल्डोला आदर्श मानणाऱ्या आक्रमकपटू खविचा क्वारात्सखेलियाच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर जॉर्जियाने युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद करताना रोनाल्डोच्याच पोर्तुगालवर २-० असा विजय मिळवला. या विजयासह जॉर्जियाच्या संघाने बाद फेरीत प्रवेश केला.
पोर्तुगालचे बाद फेरीतील स्थान आधीच निश्चित असल्याने या सामन्यासाठी प्रशिक्षक रोबर्टो मार्टिनेझ यांनी राखीव फळीतील खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात तुर्कीवर विजय मिळवणाऱ्या पोर्तुगाल संघातील केवळ तीन खेळाडूंचे स्थान जॉर्जियाविरुद्धच्या सामन्यासाठी कायम राहिले. यात कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू रोनाल्डोचाही समावेश होता. मात्र, रोनाल्डोला सलग तिसऱ्या सामन्यात गोल करण्यात अपयश आले. पूर्वार्धात त्याने पेनल्टीसाठी अपील केले, पण पंचांनी त्याला दाद दिली नाही. पोर्तुगालच्या अन्य खेळाडूंनाही फारशी चमक दाखवता आली नाही.
याउलट बाद फेरी गाठण्यासाठी विजय अनिवार्य असल्याचे ठाऊक असल्याने जॉर्जियाने अप्रतिम सांघिक खेळ केला. तारांकित आक्रमकपटू क्वारात्सखेलियाने सामना सुरू होऊन अवघे ९३ सेकंद झाले असतानाच गोल करत जॉर्जियाला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. युवा बचावपटू अॅन्टोनियो सिल्वाच्या दोन चुका पोर्तुगालला महागात पडल्या. त्याच्या चुकीच्या पासमुळे जॉर्जियाला चेंडू मिळाला आणि जॉर्जेस मिकाउताद्झेच्या साहाय्याने क्वारात्सखेलियाने गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात ५७व्या मिनिटाला सिल्वाने गोलकक्षात लुका लोचोश्विलीला पाडले आणि जॉर्जियाला पेनल्टी मिळाली. मिकाउताद्झेने यावर गोल करत जॉर्जियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मग ही आघाडी अखेरपर्यंत टिकवत जॉर्जियाने युरो स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.
हेही वाचा >>>IND vs ENG: भारताच्या विजयानंतर रोहितच्या डोळ्यात तरळले विजयाश्रू, विराट कोहलीने साधला हिटमॅनशी संवाद; VIDEO व्हायरल
जॉर्जियाच्या संघाची ही पदार्पणाची युरो स्पर्धा आहे. त्यात फ-गटात तिसरे स्थान मिळवत जॉर्जियाने बाद फेरी गाठली. साखळी फेरीसाठी सहा गट करण्यात आले होते आणि त्यातील अव्वल दोन संघ, तसेच तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम चार संघांना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला. फ-गटात पोर्तुगाल आणि तुर्की यांचे समान सहा गुण झाले. मात्र, सरस गोलफरकामुळे पोर्तुगालला (२) अग्रस्थान मिळाले, तर तुर्कीला (०) दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आता उप-उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालची स्लोव्हेनियाशी, तुर्कीची ऑस्ट्रियाशी, तर जॉर्जियाची स्पेनशी गाठ पडेल. स्पेनने साखळी फेरीत आपले तीनही सामने जिंकले. त्यामुळे जॉर्जियाविरुद्धच्या सामन्यात स्पेनचेच पारडे जड मानले जाईल.
तुर्कीचा सनसनाटी विजय
फ-गटातील अन्य सामन्यात ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत चेंक टोसूनने केलेल्या गोलच्या जोरावर तुर्कीने चेक प्रजासत्ताकवर २-१ असा सनसनाटी विजय नोंदवला. या सामन्यात पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात ५१व्या मिनिटाला कर्णधार हकान चालोनोग्लूने गोल करत तुर्कीला आघाडी मिळवून दिली. मात्र, चेक प्रजासत्ताकने चोख प्रत्युत्तर देताना ६६व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यांच्यासाठीही कर्णधार टोमास सुचेकने गोल केला. अखेर ही लढत बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच ९४व्या मिनिटाला टोसूनने तुर्कीला निर्णायक आघाडी मिळवून दिली.