फुटबॉल जगतातील नामवंत खेळाडू आणि पोर्तुगालचा आधारस्तंभ असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला आपल्या शेवटच्या युरो चषकात संघाला यश मिळवून देता आलेले नाही. फ्रान्सविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ने पराभव झाला. किलियन एम्बापेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फ्रान्सचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला असून आता ते स्पेनशी भिडणार आहेत. जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातील फोक्सपार्कस्टेडियन मैदानात पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स हा बहुचर्चित सामना पार पडला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट करून सामन्याचा निकाल जाहिर झाला.
दरम्यान स्पेननेही यजमान जर्मनीचा पराभव करत मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स या सामन्याला युरो २०१६ चषकाच्या अंतिम सामन्याची पार्श्वभूमी होती. २०१६ रोजी पोर्तुगालने फ्रान्सला अंतिम सामन्यात एका गोलने नमवले होते. त्या पराभवाची परतफेड आता किलियन एम्बापेच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने केली आहे.
युरो चषकाच्या सुरुवातीपासून पोर्तुगाल आणि फ्रान्स हे विजयाचे दावेदार समजले जात होते. परंतु पोर्तुगालला जगज्जेत्यांप्रमाणे खेळ करता आलेला नाही. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळविल्यानंतर जॉर्जिया आणि स्लोव्हेनियाविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या संघाला एकही गोल करता आला नाही. उपांत्यपूर्व फेरीतही हाच कित्ता गिरवला गेला.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात काय झालं?
१२० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघापैकी एकालाही गोल करता आला नाही.अतिरिक्त वेळेत दोन्ही संघानी बचावात्मक पवित्रा घेतल्यामुळे त्या वेळेतही गोल झाला नाही. त्यानंतर पेनल्टी शूटआऊट करण्याचा निर्णय झाला. पोर्तुगालकडून तीन गोल करण्यात आले. मात्र बाकीचे खेळाडू गोलकिपरला भेदण्यात अपयशी ठरले. फ्रान्सचा गोलकिपर मॅगननने तीनवेळा मोठ्या चपळाईने गोल रोखला.