साधारणपणे प्रत्येक व्यक्ती आपल्या बालपणात आणि किशोरवयात प्रचंड खेळकर असते. या वयोगटातील मुले सतत काहीना काही खेळ खेळण्यात व्यस्त असतात. मुलांबद्दल बोलायचे झाल्यास, क्रिकेट हा आपल्या देशातील मुलांचा विशेष आवडता खेळ आहे. प्रत्येक गावात आणि शहरात तुम्हाला ठिकठिकाणी क्रिकेट खेळणारी मुले सहज दिसतील. मुलांनी अशा प्रकारे क्रिकेट खेळण्याचा एकच तोटा आहे, तो म्हणजे शेजारीपाजाऱ्यांच्या खिडक्यांची होणारी तोडफोड आणि त्यानंतर होणारे वाद. हे वाद टाळण्यासाठी बहुतेक पालक मुलांना रागवताना दिसतात. मात्र, भारतीय संघात सध्या असा एक खेळाडू आहे, ज्याची आई त्याला खिडक्यांच्या काचा फोडल्यामुळे कधीच रागावली नाही. उमरान मलिक, असे या खेळाडूचे नाव आहे.
या आयपीएल हंगामात १४ सामन्यांत २२ बळी घेऊन मलिक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ठ सहाय्यक संपादक देवेंद्र पांडे यांनी त्याच्याशी खास गप्पा मारल्या. यावेळी उमरान मलिकने आपल्या आईची तोंडभरून स्तुती केली.
नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत उमरान मलिकसाठी लाखो लोकांनी टाळ्या वाजवल्या. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे. त्याला हजारो नवीन चाहते मिळाले. पण, आपल्या आईची सर कुणालाच नाही, असे उमरानचे म्हणणे आहे. बालपणीच्या आठवणी सांगताना उमरान म्हणाला, “मी लहान असताना, घरी प्लास्टिकच्या चेंडूने खेळायचो. खेळताना खिडक्यांच्या काचा फोडल्याबद्दल मला बोलणी बसायची. पण, माझ्या आईने मला कधीही थांबवले नाही. ती उलट मला खेळ आणि तोड असे म्हणायची.”
हेही वाचा – जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकला मिळतो ‘या’ गोष्टींतून आनंद
यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादसाठी पहिल्यांदा खेळल्यापासून मलिकच्या आयुष्यात गेल्या वर्षभरात बरेच बदल झाले. आयपीएलच्या १५व्या हंगामात तर त्याने सातत्याने ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले.
“माझे वडील फळविक्रीचा व्यवसाय करतात आणि तो ते कधीच बंद करणार नाहीत. गेल्या ७० वर्षांपासून याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात कितीही बदल झाले तरी या सर्व गोष्टींचा माझ्या कुटुंबाला काही फरक पडणार नाही. आपण कोणत्या परिस्थितीतून सुरुवात केली आहे याचे कायम भान ठेवले पाहिजे, अशी माझ्या वडिलांची शिकवण आहे. त्यामुळे त्यांना माझा अभिमान वाटेल, असा खेळ करण्यावर माझा भर राहिल,” असे उमरान मलिक म्हणाला.