अनंत आनंदाचे क्षण दिल्यावर मिळणाऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने त्यांना दीर्घायुष्य लाभते, असेच काहीसे घडले आहे ते मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बाबतीत. चाळिसाव्या वाढदिवसाचा केक कापताना सचिन थोडासा चिंतेत वाटला खरा, पण या आनंदाच्या क्षणी आपल्यावर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिनशर्त प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. एका छोटेखानी कार्यक्रमात सचिनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याची पत्नी अंजलीसह मुंबई इंडियन्स संघातील काही सहकारीही होते.
‘‘केक कापताना मी एवढा दडपणाखाली कधीच नव्हतो. हा माझ्यासाठी हृद्य असा क्षण असून याबद्दल मी साऱ्यांचे आभार मानतो,’’ असे सचिन केक कापल्यावर म्हणाला.
तो पुढे म्हणाला, ‘‘भारतीय संघातील माजी सहकारी अनिल कुंबळेच्या शुभेच्छांनी माझ्यावरचे दडपण थोडे कमी झाले. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मला अनिल भेटला, त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला घाबरू नकोस, ४० हा फक्त एक आकडा आहे. त्याच्या या बोलण्याने मी सुस्कारा सोडला आणि शांत झालो.’’
यावेळी आपल्या जगभरातील चाहत्यांचे धन्यवाद सचिनने मानले. तो म्हणाला की, ‘‘या संधीचा फायदा घेऊन माझ्या जगभरातील चाहत्यांचे मी आभार मानतो. त्यांनी भरपूर पाठिंबा दिला, विश्वास ठेवला, बिनशर्त प्रेम केले, त्यांच्यामुळेच मी गेली २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो. त्यामुळेच हा क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी बऱ्याच जणांनी आयुष्य वेचले आहे, मी दुखापतग्रस्त असताना काही जणांनी उपवास केले होते, देवाला साकडे घातले होते, या सर्वाना खरे तर मी भेटायला हवे, पण ते शक्य नाही.’’
सचिनला अंजलीने यावेळी केक भरवला. त्यानंतर सचिन मिश्कीलपणे म्हणाला ‘‘आता अंजलीला माझ्या चेहऱ्यावर केक फासायला सांगू नका!’’ तेव्हा एकच हंशा पिकला.
वय खेळाच्या आड येत नाही
वय हा काही मुद्दा नाही, ते खेळाच्या आड येत नाही. जोपर्यंत मी क्रिकेटच्या आनंदाचा उपभोग घेत आहे, माझे शरीर आणि मन जोपर्यंत एकत्रपणे काम करत आहे, तोपर्यंत मी खेळतच राहीन. चाळिशीचा केक कापताना मी थोडा लाजत होतो, मी जवळपास १५ वर्षांचा आहे असे मला वाटत होते. मी चाळिशीचा आहे, असे मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही वयाकडे बघता, तेव्हा त्यानुसार तुम्ही कामे करायला लागता. मी जेव्हा पदार्पण केले तेव्हा के. श्रीकांत कर्णधार होता आणि आता त्याचा मुलगा अनिरुद्ध माझ्यासमोर आयपीएलमध्ये आहे. क्रिकेटमध्ये असे होत असते. जे काही मी माझ्या आयुष्यात कमावले आहे ते फक्त क्रिकेटमुळेच. आतापर्यंतचा प्रवास हा अद्भूत असाच होता. मी बरेच दौरे केले, हा प्रवास उत्साहपूर्ण होता. खेळाची मी नेहमीच काळजी घेतली आणि माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचे आभार.
सचिन तेंडुलकर