‘‘रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी हीसुद्धा मोलाची असते. फार कमी संघांना हा मान मिळाला आहे. प्रत्येक विजेतेपद हे महत्त्वाचे असते. याचप्रमाणे प्रत्येक जेतेपद हे त्या संघासाठी आणि असोसिएशनसाठी अविस्मरणीय असते. त्यामुळेच चाळिसावे विजेतेपद आमच्यासाठी खूप विशेष आहे. मुंबईने रणजीची परंपरा जपत ३९वेळा हा मान संपादन केला आहे. यंदा चाळिसाव्या जेतेपदाची सर्वानाच मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे मुंबईकरांना विजयाचा नजराणा पेश करण्यासाठी आम्ही आतुर आहोत,’’ असे मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी यांनी मागील हंगामापासून मुंबई संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यावेळी मुंबईने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. सौराष्ट्रविरुद्ध शनिवारपासून सुरू होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्याबाबत कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी खास बातचीत केली.
अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर मुंबईसोबत असल्याचा कितपत फरक पडेल?
२३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव गाठीशी असणारा हा जगातील सर्वात लाडका क्रिकेटपटू रणजीसाठी मुंबईच्या संघातून मैदानावर असणे, हे आमच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मुंबईकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मी गेली ३५ वष्रे क्रिकेट जवळून पाहतोय. रणजी सामन्यांना इतकी गर्दी कधीच खेचली जात नाही. पण सचिनसाठी क्रिकेटप्रेमी रणजी सामन्यालाही येतात. यंदाही सचिन वानखेडेवर खेळलेल्या दोन्ही सामन्यांना मुंबईच्या क्रिकेटरसिकांनी आवर्जून हजेरी लावली. त्याचे लाजवाब फटके आणि क्षेत्ररक्षणालाही त्यांनी मनमुराद दाद दिली. याशिवाय सचिनच्या अनुभवाचे बोल संघातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरतात.
मुंबईने उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात फक्त एकच निर्णायक विजय मिळवला, याबाबत तुम्ही काय सांगाल?
यंदा पंजाबच्या संघाने चार निर्णायक विजयांनिशी बाद फेरी गाठली. पण नंतर त्यांचा आलेख घसरला. गतवर्षी मुंबईने एक सामना बाकी असतानाच बाद फेरीतील स्थान निश्चित केले होते. माझ्या मते साखळी फेरीत तुम्ही किती निर्णायक विजय मिळवले किंवा गुण जमवत-जमवत शेवटी बाद फेरी गाठली, याला काहीच अर्थ नसतो. या वर्षी मुंबईच्या संघाचे बाद फेरी गाठण्याचे लक्ष्य स्पष्ट होते. बाद फेरीत स्वतंत्र मानसिकता जोपासावी लागते. आमची बाद फेरीतील कामगिरी पाहा. उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध आम्ही ६४५ धावा उभारल्या. उपांत्य फेरीत सेनादलाविरुद्ध मुंबईने ४५४ धावा केल्या. अशा रीतीने मुंबईच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला.
साखळीमध्ये आपण राजकोटला सौराष्ट्रविरुद्ध खेळलो. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर आपण तीन गुण मिळवले होते. अंतिम सामन्यात त्या कामगिरीचे पाठबळ असेल का?
राजकोटला मुंबईचा संघ चांगलाच खेळला होता. पहिल्या डावातच आपण ६०० धावा काढल्या होत्या. त्या सामन्यात पहिल्या डावात मिळविलेल्या आघाडीचा आत्मविश्वास आमच्यासोबत असेल. पण तो साखळी सामना होता. साखळी सामना आणि बाद फेरीचा सामना यात फार असतो. आता तर मुंबई-सौराष्ट्र हे संघ रणजी जेतेपदासाठी अंतिम लढतीत झुंजणार आहेत. त्यामुळे पूर्णत: स्वतंत्रपणे प्रतिस्पध्र्याचा विचार करावा लागतो. याचप्रमाणे तो सामना राजकोटला होता आणि हा वानखेडे स्टेडियमवर आहे. घरच्या मैदानावर आमचे पारडे नक्कीच जड असेल.
रणजीच्या पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत मुंबईच्या संघातील खेळाडू बदलत होते, पण कामगिरीत स्थर्य होते. याचे काय रहस्य आहे?
साखळीमध्ये आठ सामने होते. प्रत्येक सामन्यानंतर तीन दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतर नवा सामना समोर असायचा. या काळात गोलंदाजांना ताजेतवाने ठेवणेही आवश्यक होते. आम्ही या वर्षी नऊ वेगवान गोलंदाज वापरले. पण हे बदल करताना आम्ही महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये बदल केले नाही. काही सामने रोहित खेळला, काही अजिंक्य खेळला. एकेक सामन्याचे आव्हान पार करीत बाद फेरीपर्यंत पोहोचणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य होते. त्यामुळे ‘रोटेशन पॉलिसी’ ही ओघातच आली.
अनुभवी खेळाडू मुंबईकडे असतानाही यंदा कौस्तुभ पवार, आदित्य तरे, हिकेन शाह, अंकित चव्हाण यांच्यासारखे युवा खेळाडू जबाबदारीने खेळताना आढळले?
मुंबईकडून सचिन, झहीर खान, वसिम जाफर, अजित आगरकर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय अनुभव असणारे तारे खेळत असतानाही नवी फळी घडविणे, ही आमची भविष्याच्या दृष्टीने योजनाच होती. मुंबईची दुसरी फळी ही या अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखालीच तयार करायची, असे आम्ही ठरविले होते. मला या गोष्टीचा अत्यंत आनंद होत आहे की, सचिनसारख्या खेळाडूसोबत या युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. गेल्या दोन वर्षांत सहा-सात खेळाडू मुंबईच्या भविष्यासाठी तयार झाले आहेत. याचा फायदा त्या खेळाडूंना आणि मुंबईला होईल.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई : अजित आगरकर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वासिम जाफर, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, अभिषेक नायर, हिकेन शाह, आदित्य तरे, अंकित चव्हाण, निखिल पाटील (ज्यु.), जावेद खान, सुशांत मराठे, शार्दुल ठाकूर आणि विशाल दाभोळकर.
सौराष्ट्र : जयदेव शाह (कर्णधार), सागर जोगियानी, सितांशू कोटक, शेल्डन जॅक्सन, अर्पित वासावडा, राहुल दवे, कमलेश मकवाना, चिराग पाठक, सिद्धार्थ त्रिवेदी, जयदेव उनाडकट, विशाल जोशी, धर्मेद्र जडेजा, संदीप मणियार, सौर्य सनंदिया आणि हर्ष अंघन.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.पासून
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा