India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match: सेमीफायनलमध्ये ३९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंडला ७० धावांनी पराभूत करत भारतानं दिमाखात वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला आहे. येत्या रविवारी अहमदाबाद स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्याशी भारतीय संघ दोन हात करणार आहे. मात्र, सध्या भारतानं न्यूझीलंडला पराभूत करत २०१९ वर्ल्डकपचा वचपा काढल्याची जोरदार चर्चा चालू आहे. त्यात विराट कोहलीचं विक्रमी ५०वं शतक आणि शमीनं घेतलेल्या सात विकेट्स भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी स्वप्नवत पर्वणी ठरत आहे. मात्र, सगळ्यांच्या तोंडी विराट, अय्यर, शमीची नावं रेंगाळत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं भारताच्या विजयाचं श्रेय त्यांना देण्यास नकार दिला आहे.
टीम इंडियानं न्यूझीलंडला पराभूत करत यंदाच्या विश्वचषकातील आपली विजयाची मालिका कायम ठेवली आहे. या विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय संघ पराभूत झालेला नाही. त्यामुळे सलग १० सामने जिंकण्याचा विक्रम भारतीय संघानं केला आहे. आता ११वा सामना जिंकून विश्वचषकावर टीम इंडियानं तिसऱ्यांदा नाव कोरावं, अशीच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. या सर्व चर्चांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं या वर्ल्डकपमध्ये वेगळ्याच स्टाईलमध्ये केलेली फलंदाजी काहीशी दुर्लक्षित होत असून नासिर हुसेननं रोहित शर्माला सेमीफायनलमधील विजयाचं श्रेय दिलं आहे!
“खरा हिरो रोहित शर्मा”
नासिर हुसेननं सामना संपल्यानंतर एका वाहिनीवर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये विराट कोहली, मोहम्मद शमी किंवा श्रेयस अय्यरपेक्षाही रोहित शर्मा सामन्याचा खरा हिरो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “या सामन्याच्या बातम्यांसाठी कदाचित वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन्समध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी असतील. पण या भारतीय संघाचा खरा हिरो कुणी असेल, तर तो रोहित शर्मा आहे. रोहित शर्मानं या भारतीय संघाची खेळण्याची पद्धतच बदलून टाकली आहे”, असं नासिर म्हणाला.
टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! ‘सुपर सेव्हन’ शमीपुढे न्यूझीलंडने टेकले गुडघे, ७० धावांनी शानदार विजय
“तेव्हा रोहित शर्मा दिनेश कार्तिकला म्हणाला होता की..”
“गेल्या वर्षी जेव्हा अॅडलेडवर झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा पराभव केला होता, तेव्हा दिनेश कार्तिक त्या संघाचा भाग होता. तेव्हा भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती. फलंदाजांची कामगिरीही ढेपाळली होती. इंग्लंडनं भारताचा तब्बल १० विकेट्सनं पराभव केला होता. तेव्हा रोहित शर्मानं दिनेश कार्तिकला म्हटलं होतं की संघानं खेळायची पद्धत बदलायला हवी”, अशी आठवणही नासिरनं यावेळी सांगितली.
रोहित शर्मानं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ज्या प्रकारे सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली, त्याचा टीम इंडियाला फायदा झाल्याचं मत नासिरने व्यक्त केलं आहे. सेमीफायनलमध्ये रोहित शर्मानं सलामीला फक्त २९ चेंडूंमध्ये ४७ धावा कुटल्या. शिवाय, मधल्या ओव्हर्समध्ये धावांची गती कमी झाली असतानाही रोहित शर्मानं भारतीय फलंदाजांना गती वाढवण्याचा संदेश दिला, यावर नासिरने भर दिला आहे.
“रोहितनं त्याच्या फलंदाजीतून दाखवून दिलं की…”
“मला वाटतं रोहित शर्माच विजयाचा खरा हिरो आहे. लीग फेरीची गणितं वेगळी असतात. पण नॉकआऊट सामन्याचं दडपण वेगळं असतं. रोहित शर्मानं त्याच्या सलामीच्या खेळीनं हे दाखवून दिलं की लीग फेरीप्रमाणेच ते नॉकआऊट सामन्यांमध्येही आक्रमक खेळ करू शकतात. रोहित शर्मानं कशा पद्धतीने खेळायचं याचा आदर्शच इतर फलंदाजांना घालून दिला”, असंही नासिर हुसेननं नमूद केलं.