Laxman Sivaramakrishnan Latest Marathi News: यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक चर्चेत राहिलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान! या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्याची अशीच चर्चा व उत्सुकता क्रिकेटचाहत्यांमध्ये असते. पण हा सामना विश्वचषक स्पर्धेतला असला तर मग जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी ती पर्वणीच! शनिवारी भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि भारतात दिवाळी साजरी झाली! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर किमान लाखभर क्रीडारसिकांनी एकच जल्लोष केला. मात्र, या सामन्यानंतर तिथल्या काही मुद्द्यांवरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अशीच एक चर्चा म्हणजे सामन्यादरम्यान होत असणाऱ्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा!
पाकिस्तानच्या विकेट्स पडत असताना स्टेडियममध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात असल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून ‘हे योग्य आहे का? श्रीराम यांचा उल्लेख सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असावा, शत्रुत्व नव्हे’ असा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी कठोर शब्दांत टिप्पणी केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शिवरामकृष्णन यांनी या पोस्टमध्ये गंभीर दावा केला आहे.
Aus vs SR: ऑस्ट्रेलियाने खरंच अशा खेळाडूला कर्णधार नेमलं?…
काय म्हणाले लक्ष्मण शिवरामकृष्णन?
आपल्या पोस्टमध्ये शिवरामकृष्णन यांनी त्यांना पाकिस्तानमध्ये आलेल्या अनुभवांबद्दल दावा केला आहे. “एक १६ वर्षांचा मुलगा म्हणून मला पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीच्या हेटाळणीचा सामना करावा लागलाय, ते माझं मलाच माहिती. माझ्या रंगावरून, माझ्या धर्मावरून, माझ्या देशावरून आणि माझ्या संस्कृतीवरून हेटाळणी झाली. त्यामुळे जर तुम्हाला असा कुठला अनुभव आला नसेल तर कृपा करून या गोष्टींवर बोलू नका”, असं लक्ष्मण शिवरामकृष्णन आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
या सामन्यात पाकिस्तानचा विकेट-कीपर बॅटर मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परत जात असताना जय श्रीरामच्या घोषणा स्टेडियममझ्ये दिल्या गेल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे हा मुद्दा चर्चेत आला असताना दुसरीकडे मोहम्मद रिझवाननं त्याची श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातली शतकी खेळी गाझा पट्टीतील नागरिकांना समर्पित केली आहे. त्यावरूनही रिझवान चर्चेत आला आहे.