आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेनिमित्त भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असते. २८ ऑगस्ट रोजी आशिया चषकामध्ये दोन्ही संघ स्पर्धेतील आपल्या पहिला सामना खेळतील. या सामन्याची आतापासून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही आपल्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
आशिया चषकानिमित्त ‘स्टार स्पोर्ट्स’ या क्रीडा वाहिनीने एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमामध्ये माजी क्रिकेटपटू भारत-पाकिस्तान सामन्यांबद्दलच्या आठवणी क्रिकेट चाहत्यांना सांगताना दिसतात. या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये माजी फिरकीपटू हरभजन सिंगला निमंत्रित करण्यात आले होते. त्याने भज्जीने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि हरभजन सिंग मैदानावर कितीही कट्टर शत्रू असले तरी मैदानाबाहेर ते एकमेकांचे चांगले मित्र होते. आपल्या या मैत्रीबाबत हरभजनेने काही किस्से सांगितले. जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असे तेव्हा लाला (आफ्रिदी) हरभजनसाठी पाकिस्तानमधून भेटवस्तू आणत असे. त्यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानी ड्रामा आणि पेशावरी जुतींचा समावेश असे. हरभजन म्हणाला, “पाकिस्तानच्या संघात माझे अनेक मित्र होते. लाला तर माझ्यासाठी पाकिस्तानी ड्रामा आणि पेशावरी जुती घेऊन येत असे.”
भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधाचा इतिहास खूप जुना आणि संस्मरणीय आहे. मात्र, दोन्ही देशांचे परराष्ट्रीय संबंध ताणले गेल्यामुळे द्वीपक्षीय क्रिकेट मालिका बंद आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्येच दोन्ही देश सामने खेळतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना २४ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला होता. यूएईमधील टी २० विश्वचषक स्पर्धेत झालेला हा सामना पाकिस्तानने जिंकला होता.