Leopard attack on former cricketer Guy Whittle : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल झिम्बाब्वेच्या बफेलो रेंजमध्ये असताना बिबट्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्याला एअरलिफ्टने हरारे येथे नेण्यात आले. गाय व्हिटलची पत्नी हॅना स्टोक्स व्हिटल हिने सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. तसेच आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने गाय व्हिटलने त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवले असल्याचेही सांगितले. या पोस्टसोबतच तिने उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहेत. या हल्ल्यादरम्यान त्याचे खूप रक्त वाया गेल्याचेही सांगितले.
रक्ताने माखलेला व्हिटलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल –
गाय व्हिटलच्या पत्नीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गाय व्हिटल हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. तसेच संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले दिसत आहे. गाय व्हिटलची पत्नी हन्ना स्टोक्स हिने पोस्टद्वारे सांगितले की, बिबट्याने हल्ला केला, पण कसा तरी त्याचा जीव वाचवण्यात यश आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाय व्हिटल ट्रेकिंगवर होता, मात्र याचदरम्यान त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, रक्ताने माखलेला गाय व्हिटलचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स गाय व्हिटलच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी सतत शुभेच्छा देत आहेत.
गाय व्हिटलच्या पत्नीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. तिने बिबट्याच्या हल्ल्याबाबत सांगितले तसेच रुग्णालयाचे आभारही मानले. ती म्हणाले, “आम्ही खूप भाग्यवान आहोत की हिप्पो क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी त्यांची इतकी चांगली काळजी घेतली. त्यानंतर त्याला बफेलो रेंजमधून हरारे येथे एअर ॲम्ब्युलन्सने नेण्यात आले. त्यानंतर त्याला मिल्टन पार्क रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या तो उद्या सकाळी होणाऱ्या शस्त्रक्रियेची वाट पाहत आहे. कारण आज त्याचे बरेच रक्त वाया गेले आहे. उद्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या बँडेज काढल्यावर आपल्याला अधिक कळेल.”
हेही वाचा – BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन
यापूर्वीही त्याला वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. २०१३ मध्ये त्याला झिम्बाब्वेतील हुमनी लॉजमध्ये त्यांच्या पलंगाखाली ८ फूट लांबीची मगर आढळली होती. १५० किलो वजनाची मगर कोणाच्याही लक्षात न येता आत गेली आणि रात्रभर शांतपणे तिथेच पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मोलकरणीच्या आरडाओरडामुळे घरात मगरी असल्याची माहिती सर्वांना झाली.
गाय व्हिटलची अशी होती क्रिकेट कारकीर्द –
गाय व्हिटल एक दशक झिम्बाब्वेकडून खेळला आहे. त्याने झिम्बाब्वेसाठी ४६ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळले. ४६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २०३ च्या सर्वोच्च धावसंख्येसह २२०७ धावा केल्या आणि ५१ विकेट्सही घेतल्या. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २७०५ धावा असून ८८ विकेट्स घेण्यातही तो यशस्वी ठरला आहे. त्याचे कसोटी पदार्पण १९९३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झाले होते. त्याचवेळी त्याने या वर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००३ मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसला होता.