खो-खोमधील पहिल्यावहिल्या प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क येथे खो-खो रसिकांना शानदार खेळाची मेजवानी मिळणार आहे. महाराष्ट्राचे ७८ अव्वल खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई रायडर्स, सबर्बन योद्धाज, पुणे फायटर्स, ठाणे थंडर्स, सांगली स्मॅशर्स आणि अहमदनगर हिरोज असे सहा संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. मुंबई रायडर्सचे कर्णधारपद मनोज वैद्यकडे सोपवण्यात आले आहे. ‘खेळाचा प्रसार होण्यासाठी ही उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देईल’, असा विश्वास मुंबई रायडर्सचा कर्णधार मनोज वैद्यने व्यक्त केला. ‘या स्पर्धेच्या निमित्ताने खो-खोला ग्लॅमर मिळेल, हा खेळ अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचेल आणि युवा पिढी आकर्षित होईल’, असे मत ठाणे थंडर्सचा कर्णधार विलास करंडेने व्यक्त केले.