Joe Root on Virat Kohli and Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. हिटमॅन रोहित शर्माने दोन सामन्यांत सलग अर्धशतके झळकावली आहेत. त्याचवेळी किंग कोहलीही फॉर्ममध्ये आल्यापासून सातत्याने धावा करत आहे. नुकतेच त्याने वन डेतील ४७वे शतक पूर्ण केले. दोन्ही खेळाडूंच्या वयाचीही अनेकदा चर्चा होते. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या जो रूटने दोन्ही भारतीय खेळाडूंचे वय आणि त्यांची कामगिरी पाहून त्यावर सूचक विधान केले आहे.
जो रूटने नुकतेच टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना त्यांच्या वयानुसार सोडून देणे किंवा संघातून वगळणे हे धोकादायक आहे, असे मला वाटते.” रूटला विचारण्यात आले की विराट आणि रोहितला आगामी टी२० विश्वचषकात घ्यावे की युवा खेळाडूंना संघात प्राधान्य द्यावे? यावर रूट म्हणाला, “मी तुम्हाला एक आताचे नवीन उदाहरण देतो, ख्रिस गेल किती काळ टी२० क्रिकेट खेळला, हे तुम्हीही पाहिले असेलच. जगातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडू दीर्घकाळ क्रिकेट खेळले असून ते टिकले देखील आहेत. विशेषत: टी२० क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी देखील उत्कृष्ट आहे. जोपर्यंत ते तंदुरुस्त आहेस तोपर्यंत त्यांना संघातून बाहेर काढू नये.”
हेही वाचा: ICC ODI Ranking: आयसीसी क्रमवारीत मोठे फेरबदल! शुबमन गिलचे प्रमोशन, कुलदीपलाही झाला फायदा
रूटला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की, “या दोघांनी आता एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करावे का?” यावर रूटने सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला, “जिमी अँडरसन हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्याचे वय ४० पेक्षा जास्त आहे, तरीही तो अप्रतिम कामगिरी करत आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही (इंग्लंड) त्याला गमावले नाही कारण तो वयस्कर झाला आहे. तो अजूनही आमच्या गोलंदाजीचे नेतृत्व करत आहे. आम्ही त्याचा सर्व अनुभव आणि कौशल्ये वापरत आहोत. त्यामुळे हा सर्वस्वी त्या खेळाडूचा निर्णय असायला हवा.”
भारतीय कर्णधार रोहित शर्मा या वर्षी एप्रिलमध्ये ३६ वर्षांचा झाला. दरम्यान, रन मशीन विराट कोहली नोव्हेंबरमध्ये ३५ वर्षांचा होईल. दोन्ही खेळाडूंनी आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. मग तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असो किंवा श्रीलंकेविरुद्धचा सामना असो. रोहितने नुकताच १०,००० धावांचा आणि विराट कोहलीने १३,००० धावांचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने सुपर-४मध्ये सलग दोन सामने जिंकल्याने ते थेट अंतिम फेरीत पोहचले आहेत. भारताचा पुढील सामना शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. बांगलादेश याआधीच आशिया चषकातून बाहेर पडला आहे.