भारताच्या अंडर १९ संघाच्या कर्णधारपदी जालन्याच्या विजय झोल याची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेत विजय झोलवर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
विजय झोल आपल्या घरी मित्रांसोबत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तिरंगी मालिकेबद्दलच चर्चा करत होता आणि त्याला एका मित्राने केलेल्या ‘एसएमएस’ने घरात एकच जल्लोष व आनंदाचे वातावरण पसरले. हा ‘एसएमएस’ होता अभिनंदनाचा, विजय झोलची कर्णधारपदी निवड झाल्याचा.
” मी मित्रांसोबत मालिकेबद्दलच चर्चा करत होतो आणि एका मित्राने मला एसएमएस केला माझी कर्णधारपदी नियुक्ती झाल्याचा. हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला झालेला आनंद कसा व्यक्त करावा यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मी भरपूर खूष आहे.” असे विजय झोलने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटले.
याआधी ‘उन्मूक्त चंद’कडे भारताच्या अंडर १९ संघाची धुरा होती. उन्मूक्तच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंडर १९ विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी विजय झोल यानेही चांगली कामगिरी केली होती. तसेच २०११ सालच्या कोच्च बिहार करंडक मालिकेत ४५१ धावा आणि ‘अंडर १९ आशिया’ स्पर्धेतही विजयने चांगली कामगिरी केली होती.