मुंबई नगरीत कुस्ती हा देशी खेळ आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. गेली ५३ वर्षे मुंबईच्या कुस्तीक्षेत्रावर ‘मुंबई शहर तालीम संघ’ या संघटनेचे अधिराज्य होते. पण धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने नोंदणी झालेली ‘मुंबई शहर कुस्ती संघ’ ही संघटना मुंबईत कार्यरत झाल्यामुळे मल्लांबरोबरच कुस्ती चाहत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. दोन्ही संघटना आपलीच संघटना अधिकृत असल्याचा दावा करीत असल्यामुळे मुंबईच्या कुस्तीची या संघटनात्मक ‘दंगली’मध्ये फरफट होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई शहर तालीम संघाची १० सप्टेंबर १९५९ या दिवशी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली. या संघटनेने मुंबईच्या कुस्तीची काल-परवापर्यंत इमानेइतबारे धुरा वाहिली. पण १३ एप्रिल २०१३ला मुंबई शहर कुस्ती संघ या संघटनेची नोंदणी झाली आणि या अस्तित्वाच्या लढाईला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. याबाबत मुंबई शहर तालीम संघाचे अध्यक्ष शशिकांत देशमुख म्हणाले की, ‘‘संजय शेटे हे आमच्याच संघटनेतून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर गेले आणि त्यानंतर आमच्याच संघटनेला त्यांनी खोटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेटे हे आठ वर्षे आमच्या संघटनेत कार्याध्यक्ष होते, त्याचबरोबर १५ वर्षे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. आम्ही कुस्तीचा विकास करण्यासाठी धडपडत राहू आणि यापुढेही स्पर्धा घेत राहू. हे प्रकरण आम्ही आमच्या संघटनेचे आजीव अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातले असून, आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय मिळण्याची आशा आहे. एवढी वर्षे चालणारी आमचीच संघटना अधिकृत आहे.’’
आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना मुंबई शहर कुस्ती संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले की, ‘‘गेल्या ५३ वर्षांपासून मुंबई शहर तालीम संघ, ही संघटना कार्यरत असली तरी त्यांनी नोंदणी केल्यानंतर लेखापरीक्षण अथवा कार्यकारिणीत बदल झाल्याचा एकही अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केलेला नाही. मी या संघटनेवर उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असताना याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला होता, पण कार्यकारिणी सदस्यांनी मला धर्मादाय आयुक्तांकडे कागदपत्रे पाठवल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी या प्रकरणात जास्त लक्ष घातले नाही. पण आता ही बाब समोर आल्यानंतर मागील वर्षांचे थकीत अहवाल सादर करता येणार नाहीत, हे वास्तव आहे. जर हे शक्य असते तर नक्कीच केले असते. त्यामुळेच मुंबईतील कुस्ती तग धरून राहावी यासाठी नवीन संघटना आम्ही स्थापन केली आहे. धर्मादाय आयुक्तांबरोबरच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची आम्हाला मान्यता आहे. त्यामुळे आमचीच संघटना आता अधिकृत आहे.’’
या प्रकरणी मुंबई शहर तालीम संघाचे सरचिटणीस प्रकाश तानावडे म्हणाले की, ‘‘संजय शेटे यांनी नेमके काय केले? हा प्रश्न आहे. त्यांच्या कार्यकाळात जर त्यांनी सुरळीत व्यवहार केले असते आणि धर्मादाय आयुक्तांना कागदपत्रे सुपूर्द केली असती तर ही वेळ संघटनेवर आलीच नसती.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा