भारताविरुद्धच्या दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंकडून कडव्या झुंजीची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सर व्हिव्हिअन रिचर्ड्स यांनी व्यक्त केली.

३ ऑगस्टपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार असून या मालिकेतील पहिले दोन सामने अमेरिका येथे होणार आहेत. ‘‘भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकांमध्ये नेहमीच आक्रमक स्वरुपाचे क्रिकेट पाहावयास मिळाले आहे. त्याशिवाय वेस्ट इंडिजच्या संघातील खेळाडू सध्या ज्या प्रकारे फॉर्मात आहेत, ते पाहता भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागू शकतो. परंतु कोहलीचा संघही अव्वल दर्जाचा आहे, हे विंडीजने विसरता कामा नये,’’ असे रिचर्ड्स म्हणाले. मुंबईतील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या एका कार्यक्रमासाठी रिचर्ड्स आणि भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर उपस्थित होते.

‘‘विंडीज संघातील शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल यांसारख्या एकापेक्षा एक नामांकित खेळाडूंमध्ये एकहाती सामना जिंकण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे जेसन होल्डर कर्णधार म्हणून आता प्रगल्भ झाला असून नव्या विंडीजचा बेधडक खेळ पाहण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे रिचर्ड्स यांनी सांगितले. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराला एकदिवसीय व ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्याचा फटका भारताला महागात पडू शकतो, असेही रिचर्ड्स यांनी सांगितले.

‘‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज गवसेल, अशी मी अपेक्षा करतो. श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांसारख्या युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावयास हवा. त्याचप्रमाणे नवीन वेगवान गोलंदाजांची फळी कशा प्रकारे कामगिरी करते, यावरसुद्धा भारताचे भवितव्य अवलंबून आहे,’’ असे गावस्कर यांनी  सांगितले.

Story img Loader