पीटीआय, बंगळुरू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ‘आयपीएल’च्या नव्या हंगामात एकच सामना खेळला असला, तरीही गोलंदाजीतील त्यांची कमकुवत बाजू समोर आली आहे. त्यामुळे आज, सोमवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात बंगळुरूच्या संघाला गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा असेल.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सलामीच्या सामन्यात बंगळुरूच्या वेगवान गोलंदाजांनी उसळी घेणाऱ्या चेंडूंचा अतिवापर केला. तसेच चेन्नईतील चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीकडून फिरकीलाही मदत मिळाली नाही. बंगळुरूकडून मयांक डागर, करण शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल या फिरकीपटूंनी मिळून पाच षटके टाकली. या तिघांनी मिळून ३७ धावा देत अवघ्या एका फलंदाजाला बाद केले. तर, चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि महीश थीकसाना या फिरकीपटूंनी आठ षटकांत चार फलंदाजांना बाद केले. आता बंगळुरूच्या फिरकीपटूंना चिन्नास्वामीची छोटी सीमारेषा आणि वेगवान मैदान यांसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 GT vs MI: यंदाही मुंबई इंडियन्सची पहिली मॅच देवालाच, शुबमनच्या गुजरातने हार्दिकच्या मुंबईला पाजलं पाणी

बंगळुरू येथील या स्टेडियमवर बऱ्याच वेळा संघाने एक डावात २००हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही १७२ अशी आहे. पंजाब किंग्जविरुद्ध बंगळुरूच्या वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी असेल. मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल यांनी आपला खेळ उंचावणे गरजेचे आहे. चौथा वेगवान गोलंदाज कॅमरून ग्रीनने चेन्नईविरुद्ध दोन फलंदाजांना बाद करत चुणूक दाखवली.

चेन्नईविरुद्ध आघाडीच्या फलंदाजांनी निराश केल्यानंतरही बंगळुरूने ६ बाद १७३ धावा केल्या. बंगळुरूने ७५ धावांत पाच फलंदाज गमावले होते. परंतु, दिनेश कार्तिक व अनुज रावत यांनी संघाला १७० धावांपर्यंत पोहोचवले. आता घरच्या मैदानावर विराट कोहली, कर्णधार फॅफ डय़ुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून बंगळुरूला मोठय़ा अपेक्षा असतील.

दुसरीकडे, पंजाब संघाने दिल्लीविरुद्ध विजयी सुरुवात केली. आता बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावर राहील, तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगकडून अपेक्षा असतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expected improvement in performance from bengaluru team bowlers in ipl 2024 match against punjab kings vs royal challengers bangalore match amy