२१ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये रंगणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत भारतीय महिला विजेतेपदाच्या दावेदार नसल्या, तरीही संघातील अनुभवी खेळाडूंच्या जोरावर आम्ही बाजी मारु शकतो असा आत्मविश्वास कर्णधार राणी रामपालने व्यक्त केला आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी राणी पीटीआयशी बोलत होती.
काही खेळाडूंचा अपवाद वगळता आम्ही सर्व जणी गेल्या २ वर्षांपासून एकत्र खेळत आहोत. प्रत्येक खेळाडूकडे किमान १५० ते २०० सामन्यांचा अनुभव आहे आणि हाच अनुभव आम्हाला या स्पर्धेत तारु शकतो असं राणी म्हणाली. यावेळी विश्वचषकात आपला संघ चांगली कामगिरी करेल असा आत्मविश्वासही राणीने व्यक्त केला. ८ वर्षांच्या दिर्घ कालावधीनंतर भारतीय महिला संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. राणी आणि दिपीकाचा अपवाद वगळता भारताच्या एकाही खेळाडूकडे विश्वचषकात खेळण्याचा अनुभव नाहीये.
मागच्या वर्षी आशिया चषकाचं विजेतेपद मिळवल्यानंतर संघातील सर्व खेळाडू या संधीची वाट पाहत होत्या. त्यामुळे या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचं राणी म्हणाली. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचा समावेश ब गटात करण्यात आलेला आहे. भारताला या गटात ऑलिम्पिक चॅम्पियन इंग्लंड, अमेरिका आणि आयर्लंड या संघाचा सामना करावा लागणार आहे. २१ जुलै रोजी भारताचा पहिला सामना यजमान इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे.