दुबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यम्सन आणि भारतीय फिरकी गोलंदाज यांच्यातील संघर्ष हा चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील परमोच्च क्षण असेल, असा अंदाज क्रिकेट पंडित व्यक्त करत आहेत.भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत मुळात अधिक तीव्र असेल. त्यात फिरकी गोलंदाजी उत्तम खेळू शकणारा विल्यम्सनसारखा फलंदाज न्यूझीलंडकडे असल्यामुळे अंतिम सामन्यातील चढाओढ एक वेगळी उंची गाठेल. तेवढी क्षमता विल्यम्सनच्या फलंदाजीत आहे, असे मानले जात आहे.

न्यूझीलंडने २००० मध्ये केनियात झालेल्या ‘आयसीसी’ नॉक-आऊट स्पर्धेत भारताला चार गडी राखून हरवताना विजेतेपद मिळविले होते. आता २५ वर्षांनी पुन्हा एकदा भारताला हरवून विजेतेपद मिळविण्यासाठी न्यूझीलंड संघ उत्सुक आहे. दुसरीकडे भारतदेखील दुसऱ्यांदा विजेतेपदासाठी तेवढाच उत्सुक आहे. आतापर्यंत यशस्वी झालेले चार फिरकी गोलंदाज खेळविण्याचे नियोजन भारत अंतिम सामन्यात ठेवण्याची शक्यता कायम आहे. साखळी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना ज्या खेळपट्टीवर खेळविला गेला होता, त्याच फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर अंतिम लढत होणार आहे.

विल्यम्सनचे फिरकी गोलंदाजी खेळण्याचे कौशल्य चांगले आहे. लागोपाठच्या दोन सामन्यांत अर्धशतक आणि शतकी खेळी केल्यामुळे त्याचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड प्रशिक्षक स्टीड यांनी भारताचे चार फिरकी गोलंदाज खेळविण्याचे नियोजन आव्हानात्मक असल्याचे कबूल केले आहे. ‘‘अंतिम सामन्यातही भारत चार फिरकी गोलंदाजासह उतरू शकतो. आमच्याकडेही चार फिरकी गोलंदाज आहेत. आमचा संघ संतुलित आहे. पण, भारतीय फिरकी गोलंदाज हे नेहमीच आव्हानात्मक असतात. यासाठी आमचे नियोजन स्पष्ट असणे आवश्यक आहे,’’ असे स्टीड म्हणाले.

भारतीय फिरकी गोलंदाज त्या दिवशी अपयशी ठरतील की यशस्वी याचा विचार न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानात उतरणे महत्त्वाचे आहे. ‘‘सामन्यातील परिस्थितीला जुळवून घेणे महत्त्वाचे असेल. त्याचेळी आमच्या फलंदाजांना भारतीय फिरकीचा कसा सामना करायचा यासाठी वैयक्तिक नियोजन करावे लागेल. विशेषत: वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना तशी काळजी घ्यावी लागेल. त्याच्याकडे चेंडू टाकण्याच्या युक्तींची पोतडी भरलेली आहे,’’ असे स्टीड यांनी सांगितले.