पाकिस्तानचा समावेश असलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांना येथे होणारा विरोध लक्षात घेऊन या सामन्यांकरिता कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या शिष्टमंडळाने येथील राज्य शासनाकडे केली आहे.
पाकिस्तानचा समावेश असलेले सामने येथे घेऊ नयेत अशी मागणी बजरंग दलाने केली होती. मात्र या सामन्यांना राज्य शासनाने नुकतीच परवानगी दिल्यानंतर बजरंग दलाने गुरुवारी राज्यभर बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.
या पाश्र्वभूमीवर आयसीसी व बीसीसीआय यांच्या शिष्टमंडळाने ओडिशा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच त्यांनी राज्याचे गृहसचिव यू.एन.बेहरा व पोलिस उपमहासंचालक प्रकाश मिश्रा यांचीही भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले.
क्रीडासचिव आय.श्रीनिवासन यांनी याबाबत सांगितले, कटक येथे पाकिस्तानचे सामने होणार आहेत. हा सामना आयोजित करू नये अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. या पाश्र्वभूमीवर क्रिकेट संघटनांच्या शिष्टमंडळाने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान या संघांना कडक सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली आहे.
स्पर्धेचे संचालक सुरू नायक यांनी ही भेट अतिशय समाधानकारक झाली असल्याचे सांगून राज्य शासनाचे आभार मानले. ते म्हणाले, राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्थेची पूर्णपणे हमी घेतली आहे व सर्व सामने निर्विघ्नपणे पार पडतील अशी खात्रीही त्यांनी दिली आहे.