Wimbledon 2022 : काल (१० जुलै) विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर मानाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा ३-६, ६-३, ६-४, ७-६(३) असा पराभव करून सलग चौथ्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावले. बॉर्न बोर्ग, पीट सॅम्प्रास आणि रॉजर फेडरर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा चौथा पुरुष खेळाडू ठरला आहे. याशिवाय हे त्याच्या कारकिर्दीतील २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. त्यामुळे पुरुषांच्या सर्वकालीन ग्रँड स्लॅम लीडरबोर्डमध्ये तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. राफेल नदालच्या २२विजेतेपदांपासून तो केवळ एक पाऊल मागे आहे. असे असले तरी त्याला क्रमवारीमध्ये मोठा फटका बसणार आहे, हे नक्की.

विम्बल्डन जिंकूनही पुरुषांच्या क्रमवारीतील अव्वल पाचमधील त्याचे स्थान धोक्यात आहे. यामागे गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या अनेक घडामोडी कारणीभूत आहेत. करोना लसीच्या प्रकरणानंतर त्याला मेलबर्नमधून हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता आले नाही आणि त्याचे दोन हजार गुण कमी झाले. त्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीमध्ये राफेल नदालने त्याचा पराभव केला. तेव्हाही त्याचे गुण कमी झाले.

हेही वाचा – Wimbledon 2022: “हे काही सोपे काम नाही!” नोव्हाक जोकोविचच्या कामगिरीवर ‘मास्टर ब्लास्टर’ने दिली खास शाब्बासकी

यावेळी गुण कमी होण्याचा आणि जोकोविचच्या मैदानावरील कामगिरीची काहीही संबंध नाही. यामागे व्यावसायिक टेनिस संघटना (एटीपी) आणि महिला टेनिस संघटना (डब्लूटीए) यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेला एक निर्णय कारणीभूत आहे. रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंनी आपल्या देशाच्या ध्वजाखाली स्पर्धेत सहभाग घेतला तर त्यांना गुण मिळणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला होता. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर विम्बल्डनने बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली होती. ऑल इंग्लंड क्लबच्या निर्णयाचा त्यावेळी जोकोविच आणि नदाल यांसारख्या खेळाडूंनी निषेधही केला होता. मात्र, तरीदेखील यामध्ये बदल झाला नाही.

कसे ठरते क्रमवारीचे गणित ?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘रँकिंग पॉइंट’ हे व्यावसायिक टेनिसमधील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. दर आठवड्याला खेळाडूंचे रँकिंग ठरवताना गेल्या 52 आठवड्यातील कामगिरीचा विचार केला जातो. जेव्हा स्पर्धा संपते तेव्हा त्या स्पर्धेत खेळाडूने कमावलेले गुण जोडले जातात आणि त्याचबरोबर आधीच्या वर्षी त्याच स्पर्धेत कमावलेले गुण वजा केले जातात.

उच्च श्रेणीमुळे टूरवर अनेक विशेषाधिकार मिळतात. सर्वोच्च श्रेणी असलेल्या पहिल्या ३२ खेळाडूंना ग्रँड स्लॅमच्या अगोदर ‘सीड’ दिले जाते. ज्यामुळे पहिल्या दोन सामन्यांसाठी त्यांना एकमेकांशी खेळावे लागत नाही. काही इतर टेनिट स्पर्धांमध्ये उच्च श्रेणीतील खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय मिळतो.

पुरुष असो किंवा महिला, ग्रँडस्लॅम विजेत्याला दोन हजार रँकिंग गुण मिळतात. पुरुषांच्या स्पर्धेतील उपविजेत्याला १२०० गुण आणि महिलांच्या स्पर्धेतील उपविजेत्याला १३०० गुण मिळतात. उपांत्य फेरीतील खेळाडूंना अनुक्रमे ७२० आणि ७८० गुण मिळतात. नोव्हाक जोकोविचकडे सध्या सहा हजार ७७० गुण असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. डॅनिल मेदवेदेव (७, ९९५) आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह (७,०३०) हे त्याच्या पुढे आहेत.

हेही वाचा – विम्बल्डनवारी करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या मुलीचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही झाले फॅन; ट्वीट करून केले कौतुक

विम्बल्डनचा क्रमवारीवर कसा परिणाम झाला?

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काही खेळाडूंना नवीन गुण न मिळण्यासोबतच स्वत:च्या खात्यातीलदेखील काही गमवावे लागले आहेत. अशाच खेळाडूंमध्ये जोकोविचचा समावेश होतो. विजेतेपद जिंकूनही त्याचे दोन हजार गुण कमी झाले आहेत. अशा स्थितीत त्याचे केवळ चार हजार ७७० गुण शिल्लक असून आणि तो जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर पाहचेल. रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला मात्र, एटीपीच्या निर्णयाचा फारसा तोटा होणार नाही. त्याचे केवळ १८० गुण कमी होतील.

विम्बल्डन ‘पॉइंट फ्रीझ’चा परिणाम महिलांच्या क्रमवारीवरही दिसणार आहे. गेल्यावर्षी अंतिम फेरी खेळलेली आणि जागतिक क्रमवारीत ८व्या क्रमांकावर असलेली कॅरोलिना प्लिस्कोव्हा महिला क्रमवारीत पहिल्या १०मधून बाहेर पडेल. बेलारूसची आर्यना सबालेन्का आधीच सातव्या स्थानावर घसरली आहे. आता तिचे आणखी ७८० गुण कमी होतील. एकूणच रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे जोकोविचसारख्या व्यावसायिक टेनिस खेळाडूंना मोठा फटका बसला आहे.

Story img Loader