आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आशिया खंडामध्ये आणि जागतिक क्रिकेटमध्ये आशिया चषकाला मानाची स्पर्धा म्हणून स्थान मिळालेले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या स्पर्धेच्या स्वरुपामध्ये अलीकडील काळात अनेक बदल करण्यात आले आहेत. सामन्यातील षटकांची संख्या हा सर्वात मोठा बदल म्हणता येईल. कारण, यावर्षीची आशिया चषक स्पर्धा टी २० प्रकारात खेळवली जाणार आहे.
पहिल्या आवृत्तीत अंतिम सामना का नव्हता?
१९८४ मध्ये आशिया चषक स्पर्धेची सुरुवात झाली होती. नव्याने स्थापन झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेने आयोजित केलेली ही पहिली स्पर्धा यूएईतील शारजाह येथे खेळवण्यात आली होती. स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीतील सर्व सामने एकदिवसीय सामन्यांच्या स्वरुपात झाले होते. त्यावेळी या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या तीनच देशांनी भाग घेतला होता. त्याची सुरुवात ‘राऊंड-रॉबिन’ स्पर्धा म्हणून झाली होती. त्यामुळे, आता जसे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होतात तसे सामने पहिल्या वर्षी झाले नव्हते. ‘राऊंड-रॉबिन’मध्ये सर्वाधिक विजय मिळविलेल्या राष्ट्राला विजेता घोषित करण्यात आले. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करून पहिलेवहिले विजेतेपद मिळवले होते.
सामन्यांच्या स्वरुपात झाले बदल
१९८४मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४ पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळली गेली होती. २०१४ पर्यंत सहभागी देशांची संख्या वाढली होती मात्र, षटकांच्या संख्येत कोणतेही बदल झालेले नव्हते. परंतु, २०१६ मध्ये या स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्यात आले. तेव्हापासून आशिया चषक हा टी २० चषक झाला. २०१८मध्ये आशिया चषकातील सामने पुन्हा ५० षटकांचे करण्यात आले होते. आता यावर्षी पुन्हा सामन्यांच्या स्वरुपात बदल करण्यात आले असून सर्व सामने २० षटकांचे होणारे आहेत.
हेही वाचा – विश्लेषण: खेळाची विशेष पार्श्वभूमी नसतानाही यूएई ‘ग्लोबल स्पोर्ट्स हब’ कसे बनले?
स्पर्धेच्या स्वरुपामध्ये सातत्याने बदल का?
२०१६ मध्ये टी २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकातील सामने २० षटकांचे करण्यात आले होते. त्यानंतर, २०१९ एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर २०१८मध्ये झालेल्या आशिया चषकातील सामने पुन्हा ५० षटकांचे करण्यात आले होते. आता यावर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. येत्या ऑक्टोबर-नोब्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया चषकातील सर्व सामने २० षटकांचे होणार आहेत.
‘अशी’ असेल यावर्षीची आशिया चषक स्पर्धा
२०२२ आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. सहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि पात्रता स्पर्धा जिंकणारा संघ ‘अ’ गटात आहे. तर, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे ‘ब’ गटामध्ये आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ‘सुपर ४’ फेरीत प्रवेश करतील. सुपर ४ फेरीतील विजेते दोन संघ ११ सप्टेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळतील. स्पर्धेतील १० सामने दुबई येथे आणि तीन सामने शारजाह येथे होणार आहेत.
‘अ’ गटातील तिसरा संघ निश्चित करण्यासाठी २० ऑगस्टपासून ओमानमध्ये पात्रता फेरी सुरू होणार आहे. पात्रता फेरीत यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग हे चार संघ एकमेकांशी सामना करणार आहेत.