येत्या २७ ऑगस्टपासून आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे असूनही सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहेत. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसमोर स्पर्धा कशी भरवायची? असा प्रश्न पडलेला असताना यूएई संकटमोचक म्हणून समोर आले आहे. भूतकाळातील अनेक घटनांप्रमाणे यावेळीही यूएई क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढे आले आहे. ही गोष्ट फक्त क्रिकेटसाठीच नाही तर इतर खेळांसाठीही लागू होते. यूएईला खेळांची समृद्ध पार्श्वभूमी नसतानाही सध्याच्या काळात हा देश महत्त्वाचे जागतिक क्रीडा केंद्र (ग्लोबल स्पोर्ट्स हब) बनला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी हक्काचे ठिकाण म्हणून युएईकडे बघितले जाऊ लागले आहे. भारताच्या दृष्टीने विचार केला तर, भारताने आतापर्यंत अनेक क्रिकेट स्पर्धांसाठी युएईचा वापर केला आहे. अगदी अलीकडील उदाहरण घ्यायचे झाले तर, २०२१ इंडियन प्रिमियर लीगस्पर्धेचे घेता येईल. कोविड १९च्या वाढत्या संकटामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संपूर्ण स्पर्धाच यूएईला नेली होती. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसीसी) देखील टी २० विश्वचषकासाठी यूएईची निवड केली. गेल्या काही वर्षांमध्ये यूएईने अशा एकनाअनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. याचीच परिणीती म्हणून डिसेंबर २०२०मध्ये अबू धाबीला जगातील आघाडीच्या क्रीडा पर्यटन स्थळाचा पुरस्कार मिळाला.
हेही वाचा – हरभजन सिंगला पाकिस्तानकडून मिळायच्या भेटवस्तू! भज्जीने स्वत: केला खुलासा
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात या देशाचा हातखंडा असूनही तिथे जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे प्रमाण अत्यल्प आहे. यूएईने आतापर्यंत केवळ एक ऑलिंपिक सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकलेले आहे. याबाबात यूएई अॅथलेटिक्स फेडरेशनचे धोरणात्मक संचालक हरमीक सिंग सांगतात, “आम्ही खूप तरुण देश आहोत. (यूएईला १९७१ मध्ये युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले). आम्ही सध्या देशात क्रीडा संस्कृती रुचवण्याच्या टप्प्यात आहोत. जागतिक स्तरावरील स्पर्धा आयोजित करून आम्हाला फायदा होत आहे.”
सिंग पुढे असेही म्हणाले, “आमच्याकडे अत्याधुनिक पायाभूत क्रीडा सुविधा आहेत. त्यामुळे विकसित देश आमच्याकडे आकर्षित होत आहेत. आम्ही प्रशिक्षण उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पुरविल्या जाणार्या सुविधांवर वेगात काम सुरू केले. जागतिक कार्यक्रमांचा भाग होण्यासाठी आमच्या सरकारने ‘क्रीडा’ क्षेत्राला महत्त्व दिले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचे स्वत:चे खेळाडू नसूनही आज देशात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होतात”.
हेही वाचा – विश्लेषण : दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा कसा मिळाला? आता कोणती आव्हाने?
क्रीडा संस्कृती रुजण्यास क्रिकेट ठरले कारण
यूएईच्या जागतिक क्रीडा केंद्र बनण्याच्या प्रवासाची सुरुवात क्रिकेटपासून झाली. १०८०च्या दशकाच्या सुरुवातीला यूएईतील शारजाह येथे क्रिकेट स्टेडियम तयार झाले. ६ एप्रिल १९८४ रोजी या ठिकाणी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. त्यानंतर अनेकदा शारजाहमध्ये क्रिकेटचे सामने झाले. मात्र, खरी प्रसिद्धी मिळाली ती १९९८च्या तिरंगी मालिकेमुळे. १९९८ साली शारजाहमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सचिन तेंडुलकरने पाठोपाठ केलेल्या शतकांमुळे ‘डेझर्ट स्टॉर्म’ म्हणून प्रसिद्ध आहे. युएई हे पाकिस्तानच्या क्रिकेट संघांसाठी ‘दुसरे घर’ मानले जाते. विशेषत: आंतरराष्ट्रीय बंदीच्या काळात पाकिस्तानला आपल्या देशात सामने आयोजित करण्यास मनाई केली गेली होती. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेटला यूएईचा आधार मिळाला होता. जागतिक क्रिकेटची प्रशासकीय संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय दुबईमध्ये आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
सर्वात प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धांचेही झाले यशस्वी आयोजन
दुबई हे ‘वुमन्स टेनिस असोसिएशन’ (WTA) आणि ‘असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स’ (ATP) या सर्वात श्रीमंत टूर इव्हेंट्सचे आयोजन करते. २०२० मधील डब्ल्यूटीए प्रीमियर इव्हेंटची एकूण बक्षीस रक्कम कोट्वधी रुपये असते. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धांमध्ये मार्टिना हिंगीस, व्हीनस विल्यम्स, अँडी रॉडिक, पेट्रा क्विटोव्हा, अँडी रॉडिक, कॅरोलिन वोझ्नियाकी, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनाही आकर्षित केले आहे.
फॉर्म्युला वन रेस
२००९मध्ये अबु धाबी ग्रँड प्रिक्स ही फॉर्म्युला वन स्पर्धा सुरू करण्यात आली. उद्धघाटनाच्या वर्षापासूनच या स्पर्धेने फॉर्म्युला वन कॅलेंडरमध्ये स्थान मिळवलेले आहे. विशेष म्हणजे यूएईचा स्वत:चा एकही निष्णात मोटरस्पोर्ट ड्रायव्हर तयार झालेला नाही. असे असूनही ही स्पर्धा तिथे लोकप्रिय झाली आहे.
याशिवाय, फुटबॉल, टेबल टेनिस आणि गोल्फ याखेळांच्या क्रीडा स्पर्धाही यूएईने आजवर यशस्वीपणे आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळेच देशाचे स्वत:चे खेळाडू नसूनही यूएईने जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. येथील अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे येथे जागतिक स्तराच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, सोयीचे होते.