बीसीसीआयने ८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी मालिकेची घोषणा केली. या प्रेस रिलीजमध्ये सर्वात शेवटी विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हापासून भारतीय क्रिकेट जगभरात चर्चेला आलं असून नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
विराट कोहलीकडून कर्णधारपद का काढून घेण्यात आलं ?
विराट कोहलीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या शेवटी आपण टी-२० संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्याने आपल्यावर कामाचा खूप ताण असल्याने कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र यावेळी त्याने कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
“आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांचं महत्व लक्षात घेता आणि गेल्या ८-९ वर्षांमध्ये तिन्ही प्रकारात खेळताना माझ्यावर असलेला कामाचं ओझं आणि सलग ५-६ वर्ष नेतृत्व करताना आता मला कसोटी आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं वाटतं,” असं विराटने १६ सप्टेंबरला केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दुसरीकडे निवडकर्त्यांचा मात्र कसोटी संघात दोन कर्णधार ठेवण्याला विरोध होता. त्यानुसार रोहित शर्माकडे टी-२० सोबतच एकदिवसीय संघाचं नेतृत्वही सोपवण्यात आलं. विराट कोहलीकडे कसोटी संघाची जबाबदारी देण्यात आली.
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने इंडियन एक्स्पेसोबत बोलताना सांगितलं होतं की, “विराटने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं आणि निवडकर्त्यांनी एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद विभागून देण्याला विरोध केला. त्यानुसार पूर्णपणे विभक्त होण्याचा पर्याय देण्यात आला. थोडक्यात कसोटी संघात दोन कर्णधार असू शकत नाहीत”.
बीसीसीआय किंवा निवडकर्त्यांनी विराट कोहलीशी संवाद साधला का?
गांगुलीच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-२० संघाचं कर्णधारपद न सोडण्यासाठी विनंती केली होती. दुसरीकडे विराटने दक्षिण अफ्रिका दौऱ्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा फेटाळून लावला. आपल्याशी यासंदर्भात कोणीच संपर्क साधला नसल्याचं त्याने सांगितलं.
“‘टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नये यासाठी माझ्यासोबत कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. आफ्रिका दौऱ्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. ‘बीसीसीआय’ने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. कसोटी संघाबाबत संवाद झाल्यावर बैठक संपण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना निवड समितीच्या अध्यक्षांनी मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असं विराटने सांगितलं आहे.
विराटचे दावे बीसीसीआयने फेटाळले, संवादाचा अभाव नसल्याचं बीसीसीआयनं नाकारलं
एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत घोषणा झाली त्यादिवशी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना कर्णधार बदलाबाबत कोहलीसोबत कोणताही संवाद साधण्यात आला नव्हता. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनेही हाच मुद्दा मांडला.
ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्मा-विराटमध्ये अंतर?
सध्याच्या वादामुळे अनेकांना १९८० मधील भारतीय क्रिकेट संघाची आठवण झाली आहे. यावेळी वृत्तपत्रांमध्ये कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यातील कथित वादासंबंधी बातम्या आल्या होत्या. १९८४-८५ मधील इंग्लंड दौऱ्यातून कपिल देव यांना वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही भारतीय संघाचे स्टार खेळाडू आहेत. एकीकडे रोहित शर्मा जखमी झाला असल्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकत नसताना दुसरीकडे विराट कोहली एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने गुरुवारी यासंबंधी ट्वीट करत म्हटलं होतं की, “विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेसाठी आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे आणि रोहित शर्मा आगामी कसोटी मालिकेत खेळणार नाही. ब्रेक घेण्यात काहीच हरकत नाही, मात्र ती वेळ योग्य हवी. यातून फक्त आपापसात वाद असल्याच्या अफवांना बळ मिळत आहे.”.
कोहलीचं स्पष्टीकरण…
रोहित शर्मा कर्णधार झाल्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेत असल्याच्या केवळ अफवाच असल्याचे कोहलीने नमूद केले. ‘‘रोहितसोबत माझे नाते चांगले आहे, हे मी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ठणकावून सांगत आहे. परंतु तरीही माझ्या कृत्याचा नेहमी त्याच्याशी संबंध जोडला जातो. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी खेळणार आहे. त्यामुळे मी विश्रांती घेण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका,’’ असे कोहलीने अखेरीस स्पष्ट केले.
मग गांगुलीने कोहलीला विनंती केल्याचं सांगणं डॅमेज कंट्रोलचा भाग होता का?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा जिंकण्याचा रेकॉर्ड ७० टक्के असून एका जागतिक दर्जाच्या खेळाडूला अशा पद्दतीने फक्त ओळ लिहून कर्णधारपदावरुन काढून टाकणं फार अनादर करणारं असल्याचं सांगत अनेकांनी बीसीसीआयविरोधात नाराजी जाहीर केली आहे. कसोटीमध्ये विराटच्या नेतृत्वात भारताने अनेक रेकॉर्ड केले असून ऑस्ट्रेलियात एकामागोमाग एक मालिका जिंकल्या आहेत. तसंच इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. (पाचवा कसोटी सामना होणार नसून पुढील वर्षी पार पडणार आहे)
विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून फक्त ट्विटरवर त्याचे ४ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. कोहलीला कर्णधारपदावरुन काढून टाकल्यानंतर बीसीसीआयला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यानंतर बीसीसीआयने ९ डिसेंबरला “Thank you Captain” ट्वीट केलं. दरम्यान गांगुलीची टिप्पणी हा डॅमेज कंट्रोलचा एक भाग होता.
या घडामोडींमुळे द्रविडची भूमिका आणखी महत्वाची ठरतीये का?
क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक असणारा भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडसमोर सध्या नवं आव्हान असणार आहे. राहुल द्रविडला दोन कर्णधार तसंच ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही आलबेल राहावं यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कोहलीने राहुल द्रविडला मॅन मॅनेजमेंट चांगलं जमतं असं म्हटलं आहे.