२०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी खेळवण्यात आलेली दोन कसोटी सामन्यांची मालिका आफ्रिकने ०-२ ने गमावली होती. परंतु, या दौऱ्यावर त्यांना एक नवीन गोलंदाज सापडला होता, ज्याचे नाव आहे केशव महाराज. या केशवने दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण १६ बळी घेतले होते. यातील ९ बळी तर दुसऱ्या कसोटीतील एकाच डावात घेतले होते. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला होता. याच केशवच्या हातात काल (१९ जून) बंगळुरू येथे झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या टी २० सामन्याचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. केशव महाराजचे आणि भारताचे एक खास नाते आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘केशव’ हे नाव ऐकले की, आपल्याला लगेच हिंदू देवता ‘श्रीकृष्णा’ची प्रतिमा नजरेसमोर तरळून जाते. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज असलेल्या केशव महाराजच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरदेखील असाच काहीसा नजारा आहे. त्याच्या प्रोफाईलवर त्याने बाळकृष्णासह अनेक भारतीय देवतांचे फोटो शेअर केलेले आहेत. कारण, केशव महाराज हा भारतीय आहे. आफ्रिकेत जन्माला आलेल्या केशवकडे तिथले नागरिकत्वही आहे. मात्र, तरी तो आपला भारतीयपणा सोशल मीडियावर जाहीरपणे मिरवताना दिसतो. इतकेच काय तर, या वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर केशव महाराजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘जय श्री राम’ असा नारा दिला होता.

हेही वाचा – ‘या’ खेळाडूने बंगालला ठोकला कायमचा रामराम, आता नवीन संघात खेळताना दिसणार भारतीय यष्टीरक्षक

दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या केशव महाराजचे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर या जागेशी घट्ट नाते आहे. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे पूर्वज सुलतानपूरचे होते. १८७४ मध्ये त्यांचे पूर्वज चांगल्या नोकरीच्या शोधात भारतातून दक्षिण आफ्रिकेतीव डरबनला गेले होते. त्यावेळी आफ्रिकेत खूप संधी होत्या. आफ्रिकेला चांगल्या कुशल मजुरांची गरज होती आणि महाराजच्या पूर्वजांना शेतीचा चांगला अनुभव होता. या संधीचा फायदा घेत महाराज कुटुंबिय आफ्रिकेत स्थायिक झाले.

त्यानंतर, १९९०च्या दशकात केशव महाराजांच्या कुटुंबाने ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा विचार केला होता. त्यासाठी त्यांना सहा ते सातजणांच्या व्हिसाची आवश्यकता होती. मात्र, त्यांना ते मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडण्याचा निर्णय कायमस्वरुपी सोडून दिला. केशव महाराजच्या बहिणीचे लग्न श्रीलंकेत राहणाऱ्या व्यक्तीशी झाले आहे. केशव हा महाराज कुटुंबातील सहाव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो, जी आफ्रिकेत वास्तव्याला आहे. ‘महाराज’ हे आडनाव त्याच्या पूर्वजांची देणगी आहे. भारतात या नावाचे महत्त्व काय आहे हे याची जाणीव त्याला आहे. म्हणूनच शेकडो वर्षांपासून भारतापासून दूर असूनही त्याचे कुटुंब आजही सर्व भारतीय परंपरांचे पालन करते.

केशवला क्रिकेटचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. केशवचे वडील आत्मानंद हे देखील क्रिकेटपटू होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते यष्टिरक्षक होते. आत्मानंद यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या मुलाने मात्र, त्यांचे ह स्वप्न पूर्ण केले. ७ फेब्रुवारी १९९० रोजी डरबनमध्ये जन्मलेला केशव जेमतेम दोन वर्षांचा असताना त्याची आणि भारताचा माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांची भेट झाली होती.

१९९२ साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. वर्णभेद संपल्यानंतर पहिल्यांदाच एखादा परदेशी संघ तिथे गेला होता. याच दौऱ्यातील एका पार्टीत भारतीय वंशाच्या आत्मानंद महाराजांनी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा केशवची ओळख भारतीय क्रिकेटपटू किरण मोरेशी करून दिली. केशवच्या देहबोली बघूनच तो भविष्यात क्रिकेट खेळेल, असे मोरे आत्मानंद यांना म्हणाले होते. केशव महाराजने मोरेंची ही भविष्यवाणी खरी करून दाखवली.

मनाने अस्सल भारतीय असलेला केशव हनुमानाचा खास भक्त आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्येदेखील याचा उल्लेख केला आहे. केशवला स्वयंपाकाची आवड आहे. आपली ही आवड जोपासण्यासाठी तो एक ‘कुकिंग ब्लॉग’ही चालवतो. मातृभूमीपासून शेकडो वर्षे आणि शेकडो मैल दूर राहत असलेल्या महाराज कुटुंबियांचे भारतीय परंपरांबद्दलची आत्मीयता बघून अनेकांना त्यांचे कौतुकच वाटते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why south african spinner keshav maharaj follows indian traditions and gods vkk