काही क्रिकेटपटू असे असतात, ज्यांना ते कोणत्या देशात आणि कोणत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळतो आहोत याचा अजिबात फरक पडत नाही. त्यांच्या हातात एकदा बॉल आणि बॅट दिली ते मैदानात आपला झंजावात सुरू करतात. डेव्हिड मिलर हे एक असेच नाव आहे. याच डेव्हिड मिलरने काल (९ जून) झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाच्या हातातून विजय अक्षरश: हिसकावून नेला. दक्षिण आफ्रिकेच्या कालच्या विजयाचा नायक ठरलेला डेव्हिड मिलर आज आपल्या ३३वा वाढदिवस साजरा करत आहे.
सध्या जागतिक क्रिकटेमधील सर्वात घातक फलंदाजांमध्ये समावेश होत असलेल्या मिलरला घरातून क्रिकेटचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील क्लब क्रिकेट खेळायचे आणि आपल्या मुलानेही क्रिकेट खेळावे असा त्यांचा आग्रह होता. करिअर म्हणून नाही तर निदान शरीर तंदुरुस्त रहावे यासाठी तरी डेव्हिडने क्रिकेट खेळले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे डेव्हिडने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, शालेय जीवनात तो टेनिस, हॉकी आणि स्क्वॉशही खेळायचा.
भारतीयांना डेव्हिडची खरी ओळख आयपीएलमधून झाली असली तरी, त्याने २०१० मध्येच टी ट्वेंटीमध्ये पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो प्रसिद्ध होता. पदार्पणापाच्या सामन्यात तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिल्याच सामन्यात त्याने २६ चेंडूत ३३ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिजवर विजय मिळवून दिला होता.
डेव्हिडला ‘किलर मिलर’ या टोपणनावे ओळखले जाते. २०१३मधील आयपीएल हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्याने केवळ ३८ चेंडूत नाबाद १०१ धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. तेव्हापासून तो ‘किलर मिलर’ याच नावाने ओळखला जातो.
एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंचा स्ट्राइक रेट १०० पेक्षा जास्त आहे, अशा मोजक्या खेळाडूंमध्ये डेव्हिडचा समावेश होतो. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी १४३ एकदिवसीय आणि ९६ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. स्फोटक फलंदाज असलेला मिलर जबरदस्त क्षेत्ररक्षकही आहे. ९६ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये त्याने ७० झेल टिपले आहेत. एकूण टी ट्वेंटी क्रिकेटचा विचार केल्यास आतापर्यंत त्याने ३७८ सामन्यांमध्ये २३५ झेल घेतलेले आहेत.
मिलरने क्रिकेटसाठी अनेक देशांच्या वाऱ्या केल्या आहेत. तो डॉल्फिन्स, क्वाझुलु-नताल, किंग्ज इलेव्हन पंजाब, डरहॅम, यॉर्कशायर, चितगाव किंग्ज आणि दक्षिण आफ्रिका ए सारख्या संघांसाठी खेळला आहे. या सर्व ठिकाणी खेळलेल्या एकूण ३७८ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये त्याने आठ हजार 413 धावा केलेल्या आहेत. यामध्ये तीन शतक आणि ४२ अर्धशतकांचाही समावेश आहे. इंडियन प्रीमियर लीगचा नुकताच पार पडलेला हंगामही डेव्हिड मिलरने चांगलाच गाजवला आणि गुजरात टायट्न्सच्या विजेतपदात महत्त्वाचा वाटा उचलला होता.