कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या निवड समितीने शुक्रवारी रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा नेमणूक केली. आगामी २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री यांच्यासोबत करार करण्यात आला आहे. सल्लागार समितीला आता मुख्य प्रशिक्षकांसोबतच सहायक प्रशिक्षकांचीही नेमणूक करायची आहे. यासंदर्भात कपिल देव यांच्या सल्लागार समितीने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला पत्र लिहील्याचं समजतं आहे.

“सहायक प्रशिक्षकांच्या नेमणुकीमध्ये सल्लागार समितीला सहभागी करुन घ्यावं यासाठी कपिल देव यांनी पत्र लिहीलं आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार सहायक प्रशिक्षक नेमण्याचा अधिकार हा निवड समितीला असतो. त्यामुळे सल्लागार समितीला सहायक प्रशिक्षक नेमणुकीच्या प्रक्रियेत सहभागी करायचं की नाही याचा निर्णय प्रशासकीय समिती घेईल.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली. सोमवारपासून भारतीय संघाच्या सहायक प्रशिक्षकांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. मात्र विश्वचषकात भारतीय फलंदाजांनी उपांत्य फेरीत केलेल्या ढिसाळ कामगिरीमुळे संजय बांगर यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. बांगर यांच्याजागेवर प्रविण आमरे आणि विक्रम राठोड यांच्यात चुरस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण आमरेंवर मात करुन विक्रम राठोड भारताने नवीन फलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात.

अवश्य वाचा – प्रशिक्षकपदी पुनरागमन, आता शास्त्री गुरुजी म्हणतात मनासारखे खेळाडू निवडू द्या

Story img Loader