लंडन : कर्णधार इल्काय गुंडोगनच्या दोन गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने शनिवारी अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडला २-१ असे पराभूत ‘एफए चषक’ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.गुंडोगनचा पहिला गोल विक्रमी ठरला. सामन्याच्या १३व्या सेकंदालाच गुंडोगनने गोल करत सिटीला आघाडी मिळवून दिली. यानंतर ३३व्या मिनिटाला युनायटेडला पेनल्टी मिळाली. यावर ब्रुनो फर्नाडेसने गोल नोंदवत युनायटेडला १-१ अशी बरोबरी करून दिली. उत्तरार्धात ५१व्या मिनिटाला गुंडोगनने वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल केला. अखेर हाच गोल निर्णायक ठरला. सिटीने भक्कम बचाव करत ‘एफए चषका’चे सातव्यांदा विजेतेपद मिळवले.
तसेच यंदाच्या हंगामात तीन मोठय़ा स्पर्धा जिंकण्याचे स्वप्नही सिटीने कायम राखले. सिटीने यापूर्वीच प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले असून ते पुढील शनिवारी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत इंटर मिलानविरुद्ध खेळतील. इंटरला नमवण्यात यश आल्यास सिटीचा संघ एकाच हंगामात प्रीमियर लीग, एफए चषक आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवणारा युनायटेडनंतर (१९९९) केवळ दुसरा संघ ठरेल.