Fabian Allen was robbed by a thief : दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या एसए टी-२० लीगमधील खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू फॅबियन ॲलनला दक्षिण आफ्रिकेत बंदुकीच्या धाकावर चोरट्याने लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्याने ॲलनचा मोबाईल, बॅग आणि मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला. ही घटना ॲलन हॉटेलमधून बाहेर जात असताना घडली. ॲलन ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, ते शहरातील सर्वात मोठे हॉटेल आहे. पण असे असूनही, ॲलनसोबतच्या या घटनेने दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये खेळाडूंची सुरक्षा किती वाईट आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, एसएटी-२० लीगमधील पार्ल रॉयल्स फ्रँचायझीचा भाग असलेल्या फॅबियनसोबतची घटना सँडटन सन हॉटेलच्या बाहेर घडली. दरोडेखोरांनी त्यांना अडवून त्याच्या वस्तू बळजबरीने पळवून नेल्या. या घटनेमुळे दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या घटनेदरम्यान अष्टपैलू खेळाडूला शारीरिक इजा झालेली नाही. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकन टी-२० लीग आणि क्रिकेट वेस्ट इंडिजशी संबंधित सूत्रांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
या घटनेनंतर एक अधिकारी देखील फॅबियन ऍलनच्या सतत संपर्कात आहे. क्रिकबझशी बोलताना वेस्ट इंडिजच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, “आमचे मुख्य प्रशिक्षक आंद्रे कोली आणि फॅबियन ॲलन सतत संपर्कात आहेत. तो पूर्णपणे बरा आहे, मात्र या घटनेनंतर दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमधील खेळाडूंच्या सुरक्षेबाबतचा तणाव आणखी वाढला आहे.”
चोरीची घटना दुसऱ्यांदा घडली –
दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा हा फक्त दुसरा हंगाम आहे. पण विशेष बाब म्हणजे फॅबियन ॲलनबरोबर घडलेली चोरीची ही पहिलीच घटना नाही. या लीगच्या पहिल्या सत्रातही एका खेळाडूला लुटल्याची घटना समोर आली होती. असे असतानाही या लीगमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेमध्ये एवढी मोठी त्रुटी दिसून आली आहे.
हेही वाचा – IND v ENG : भर सामन्यात अजित आगरकरांची मैदानात एन्ट्री! रोहित शर्माशी चर्चा करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
फॅबियन ॲलन वेस्ट इंडिजकडून खेळतो –
वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने २०१८ मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून तो आत्तापर्यंत २० एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ७ विकेट घेण्याव्यतिरिक्त २०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमधला ॲलनचा विक्रमही सामान्य आहे. ३४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या फॅबियन अॅलनला केवळ २४ विकेट घेता आल्या आहेत. त्याने बॅटिंगमध्ये २६७ धावा केल्या आहेत.