आयपीएल २०२२चे सर्व १० संघ निश्चित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या महालिलावात २०४ खेळाडूंना खरेदी करण्यात आले. यापूर्वी संघांनी ३३ खेळाडूंना कायम ठेवले होते. म्हणजेच यावेळी एकूण २३७ खेळाडू टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. लिलावानंतर कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जलाही नवा कर्णधार मिळणार आहे. पंजाबचा माजी कर्णधार केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाला आहे. विराट कोहलीने गेल्या मोसमानंतर आरसीबीची कमान सोडली आहे.
इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आरसीबीचा संघ दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसकडे कमान देऊ शकतो. संघाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, ‘फाफ डू प्लेसिस हा योग्य पर्याय दिसतो, पण आमच्याकडे आता वेळ आहे. आम्ही मॅक्सवेलची उपलब्धता आणि स्थिती याबद्दल माहिती गोळा करत आहोत. सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकणार नाही हे निश्चित दिसते. अशा परिस्थितीत डू प्लेसिस हाच योग्य पर्याय आहे.”
मॅक्सवेल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशा स्थितीत तो टी-२० लीगच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. डू प्लेसिस दीर्घकाळ चेन्नई संघाचा भाग होता. गेल्या मोसमात त्याने धोनीच्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा – भारत-विंडीज ट्वेन्टी-२० मालिका : मालिकाविजयाचे लक्ष्य!
नुकत्याच झालेल्या लिलावात आरसीबीने फाफ डू प्लेसिसला ७ कोटी रुपयांना संघात दाखल घेतले. लीगच्या शेवटच्या मोसमात त्याने चेन्नईकडून खेळताना १६ डावात ६३३धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडपेक्षा तो फक्त २ धावांनी मागे होता. डू प्लेसिसनेही ६ अर्धशतके झळकावली.