Faf Du Plessis Texas Super Kings Captain: मेजर क्रिकेट लीगचा पहिला हंगामा १३ जुलैपासून यूएसमध्ये आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण १९ सामने खेळवले जाणार असून यामध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी चार संघ आयपीएलमधील फ्रँचायझीच्या मालकीचे आहेत. यामध्ये सीएसकेच्या फ्रँचायझीचे सुद्धा नाव आहे. सीएसके फ्रँचायझीने आपल्या संघाचे नाव टेक्सास सुपर किंग्स असे ठेवले आहे. आता या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे सोपवली आहे.
आयपीएलच्या मागील दोन हंगामात फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत असून संघाचा कर्णधार आहे. त्याआधी तो चेन्नई फ्रँचायझीचा भाग होता. दक्षिण आफ्रिकेच्या एसए टी-२० लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या डू प्लेसिसला आता संघ व्यवस्थापनाने पुन्हा नव्या लीगमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. फ्रँचायझीने एका खास व्हिडीओद्वारे चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये डु प्लेसिस स्वत: वेगळ्या पद्धतीने घोषणा करताना दिसला.
सीएसकेचे अनेक खेळाडू टीएसकेमध्ये खेळताना दिसणार –
विशेष म्हणजे डु प्लेसिस व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर आणि अंबाती रायुडू देखील या संघात खेळताना दिसणार आहेत. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणारा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर टेक्सास संघाचा भाग आहे. १६ व्या हंगामात चेन्नईसाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा ड्वेन ब्राव्होही या लीगमध्ये खेळाडू म्हणून खेळणार आहे. दुसरीकडे, आयपीएल आणि एसए टी-२० मधील सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे एमएलसीमध्ये टेक्सास सुपर किंग्जचे प्रशिक्षक असतील.
हेही वाचा – MLC 2023: अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्राव्हो सीएसकेच्या ‘या’ फ्रेंचायझीसाठी खेळणार, पाहा संपूर्ण संघ
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी टेक्सास सुपर किंग्ज संघ –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रस्टी थेरॉन, लाहिरू मिलनताहा, सामी अस्लम, कोडी चेट्टी, सैतेजा मुकामल्ला, केल्विन सॅवेज, मिलिंद कुमार, कॅमेरून स्टीव्हनसन, झिया शहजाद, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, ड्वेन ब्राव्हो, डॅनियल सॅम्स, मिचेल सॅंटनर.