श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी, अशी उपदेशपर वाक्ये आपल्या नित्य कानावर पडतात. पण तरीही सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक महान व्यक्तींच्या आयुष्यात अंधश्रद्धेचे स्थान मोठे असते. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर बालपणी आपल्या सवंगडय़ांसह शिवाजी पार्कच्या गणेश मंदिराबाहेरील नळाचे पाणी प्यायचा. हे दैवी पाणी आहे, अशी त्याची श्रद्धा होती. फुटबॉलविश्वसुद्धा श्रद्धा-अंधश्रद्धांचा विलक्षण आदर करते. मग केसाची स्टाइल, पायमोजे, बूट, संघाच्या बसमध्ये बसण्याची जागा असो, किंवा अगदी अंडरवेअरसुद्धा फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक यांच्या (अंध)श्रद्धेचा भाग झाल्या आहेत.
इंग्लंड संघाचे सध्याचे प्रशिक्षक रॉय हॉजसन हे कमालीचे श्रद्धाळू. आपला संघ जिंकू लागल्यास ते आपला पोशाख पुढील सामन्यातही कायम ठेवतात. मग कोट, पँट, टाय, सॉक्स इतकेच नव्हे, तर अंडरवेअरसुद्धा तीच परिधान करतात. परंतु संघ पराभूत झाल्यास मात्र प्रत्येक सामन्यात ते आपल्या पोशाखात बदल करतात. लिव्हरपूलची पराभवाची मालिका सुरू असताना ते प्रत्येक सामन्यात निराळय़ा पोशाखात पाहायला मिळाले. १९९८मध्ये फ्रान्सने जगज्जेतेपद जिंकण्याची किमया साधली होती. या स्पध्रेत फ्रान्सचा बचावपटू लॉरेंट ब्लँक संघाच्या सुयशासाठी प्रत्येक सामन्याच्या प्रारंभी डोक्यावर एकही केस नसलेल्या गोलरक्षक बार्टेझच्या चमकणाऱ्या माथ्याचे चुंबन घ्यायचा. याच बार्टेझने फ्रान्सच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच ब्लँक-बार्टेझची प्रथा ही आख्यायिकाच झाली.
‘वन मॅन आर्मी’ असे बिरूद मिरवणारा पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोसुद्धा कमालीचा श्रद्धाळू. प्रत्येक सामन्यात, मग तो देशाचा असो किंवा क्लबचा, आपल्यासाठी शुभशकुन ठरणाऱ्या गोष्टींचे पालन करण्यास तो कचरत नाही. संघाच्या बसमध्ये रोनाल्डो अखेरच्या रांगेत एकटाच बसतो आणि उतरतानाही सर्वाच्या शेवटी उतरतो. अगदी विमानात बसताना रोनाल्डो पेपेच्या शेजारी बसतो आणि सर्वाच्या आधी उतरतो. याचप्रमाणे प्रत्येक सामन्याच्या मध्यंतराला तो आपल्या केसाची स्टाइल बदलतो. पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघात फक्त रोनाल्डोला पूर्ण बाह्याचा टी-शर्ट परिधान करण्याची मुभा आहे, हासुद्धा श्रद्धेचाच भाग आहे. मैदानावर प्रवेश करतानाही रोनाल्डो उजवे पाऊल प्रथम टाकायचे, हा नियम पाळतो. तसेच सचिन जसा शतक झळकावल्यावर आभाळाकडे पाहायचा तसाच रोनाल्डो गोल साकारल्यावर आपला हात हलवून प्रथम कुटुंबाला धन्यवाद देतो.
इंग्लंडचा माजी खेळाडू जॉन टेरीच्या श्रद्धेच्या कथासुद्धा प्रचलित आहेत. तो स्टॅम्फर्ड ब्रिजवर निश्चित केलेल्या ठिकाणीच गाडी उभी करायचा. संघाच्या बसमध्येसुद्धा टेरीची एक विशिष्ट जागा होती, इतकेच कशाला मूत्र विसर्जित करण्यासाठीसुद्धा त्याची जागा निश्चित असायची. याचप्रमाणे स्टड्ससुद्धा त्याने या श्रद्धेपोटी दहा वष्रे एकच वापरले. कॅम्प नोऊ येथे संघाने पत्करलेल्या दारुण पराभवानंतर त्याने त्या पॅडला अलविदा केला.
फुटबॉलविश्वात पेलेचे स्थान कुणीही घेऊ शकणार नाही. आपण आपला यशस्वी टी-शर्ट एका चाहत्याला दिल्यामुळे आपली कामगिरी खालावली, असा कारकिर्दीतील खराब काळात त्याचा समज झाला. मग पेलेने त्या चाहत्याचा शोध घ्यायला लावला आणि आपला टी-शर्ट परत मिळवला. त्यानंतर पुन्हा पेलेची कामगिरी सुधारली. शुभशकुनी टी-शर्ट परत मिळवण्याची जबाबदारी सोपवलेल्या मित्राने खरे तर पेलेला त्याचाच आधी वापरलेला एक टी-शर्ट देऊ केला होता. पण सत्य ठाऊक नसल्यामुळे यशस्वी टी-शर्टमुळेच आपली कामगिरी पुन्हा चांगली होत आहे, अशी पेलेची धारणा झाली.
कार्लोस बिलाडरे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेटिनाने १९८६मध्ये जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली होती. या बिलार्डोच्या श्रद्धेमुळे संघातील खेळाडूंना मात्र नाहक त्रास भोगावा लागला होता. चिकन हे अपशकुनी ठरेल, म्हणून त्यांनी विश्वचषकाच्या संपूर्ण दौऱ्यावर संघाला ते खाण्यास बंदी घातली होती. या स्पध्रेतील साखळी फेरीचे सामने सुरू असताना एकदा संघाच्या बसचे नुकसान झाले. त्यामुळे खेळाडू आणि साहाय्यकांना स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी काही टॅक्सी मागवाव्या लागल्या. हा महत्त्वाचा सामना अर्जेटिनाने जिंकला आणि बिलार्डोचा टॅक्सीवर विश्वास बसला. त्यानंतर अंतिम फेरीपर्यंतच्या प्रत्येक सामन्यात याच टॅक्सींनी अर्जेटिना संघाची सोबत केली. इस्टुडायंट्सच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत एका महिलेने एका सामन्याआधी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचा संघ जिंकला. मग बिलाडरे महाशयांनी क्लबच्या अधिकाऱ्यांना त्या महिलेचा शोध घेण्याच्या कामावर जुंपले जेणेकरून प्रत्येक सामन्याच्या आधी संघाच्या यशासाठी ती शुभेच्छा देऊ शकेल!
इटलीमधील माजी फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक रोमिओ अँकोनेटानी हा प्रत्येक सामन्याआधी मैदानावर मीठ टाकायचा. सामन्याचे महत्त्व जितके अधिक, तितके मिठाचे प्रमाण जास्त यावर त्याचा विश्वास होता. एसी पिसाकडून खेळणाऱ्या रोमिओने केसिना या कट्टर प्रतिस्पध्र्याविरुद्धच्या सामन्याकरिता चक्क २६ किलो मीठ मैदानावर टाकले होते. आयव्हरी कोस्टचा बचावपटू कालू टौरेसुद्धा असाच श्रद्धाळू. संघासोबत मैदानावर तो सर्वात शेवटी प्रवेश करतो. एएस रोमाविरुद्धच्या एका सामन्यात अर्सेनलकडून खेळताना त्याच्या याच सवयीचा त्याला फटका बसला. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात विल्यम गालास दुखापतीवर उपचार घेत असल्यामुळे मैदानावर उतरू शकला नाही. परंतु गालासच्या आधी मैदानावर कसे जावे, या विचारात टॉरे असतानाच रेफ्रीने सामना सुरू केला. त्यानंतर काही वेळाने पंचांची परवानगी न घेताच टौरे मैदानावर उतरला आणि त्याला पिवळे कार्ड देण्यात आले. सुदैवाने या सामन्यात त्याचा संघ जिंकला. अन्यथा, अंधश्रद्धेपोटी संघाच्या पदरी पराभव पडला असता. रोमानियाच्या अ‍ॅड्रेन मुटू नावाच्या खेळाडूला त्याची अंडरवेअर प्रत्येक सामन्यात यशदायी वाटायची. त्याने आपल्या कारकिर्दीतील १५ वर्षांहून अधिक काळ ती प्रत्येक सामन्यात परिधान केली. २०१०च्या विश्वचषकात दिएगो मॅरेडोनाने अर्जेटिनाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. ते प्रत्येक सामन्याच्या पहिल्या सत्रात ट्रॅक सूट परिधान करायचे तर दुसऱ्या सत्रात राखाडी रंगाचा सूट घालायचे.
‘‘फुटबॉल म्हणजे जीवन-मरणापेक्षा खूप काही आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आणि संघाच्या कामगिरीसाठी नशिबावर विश्वास ठेवणे स्वाभाविक आहे,’’ असे स्कॉटलंडचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक बिली शँकी यांनी म्हटले होते. शँकी यांचे तत्त्वज्ञान फुटबॉलविश्वाला पूर्णत: लागू पडते. त्यामुळेच ‘श्रद्धा, अंधश्रद्धा आणि फुटबॉल’ यांचे ऋणानुबंधाचे नाते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा