Fake Cricket League in Gujarat : भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे. आयपीएलच्या काळात भारतामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. अनेक ठिकाणी आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीही होते. हीच कल्पना उचलून गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यातील मोलीप उर गावात एका बनावट आयपीएलचा उदय झाला. बनावट लीगचे आयोजन करणाऱ्या बहाद्दरांनी चक्क रशियन सट्टेबाजांना आपल्या जाळ्यात ओढण्याची करामत करून दाखवली. पोलिसांनी या बनावट स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

ही घटना उघडकीस येताच प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही ट्वीट करून इतर क्रिकेट चाहत्यांना या प्रकाराची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधील गावात या बनावट आयपीएल स्पर्धेचे आयोजन केले जात होते. त्यात बनावट चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि इतर आयपीएल संघांचाही समावेश केला गेलेला होता. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या लीगमध्ये रशियासह युरोपीय देशांमधून बेटिंग केली जात होती. या सामन्यांचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जात होते.

बनावट आयपीएलच्या आयोजकांनी रशियाच्या ट्व्हर, व्होरोनेझ आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून सट्टेबाजीचा खेळ सुरू केला होता. या आयोजकांनी गावातील २१ शेतमजूर आणि काही बेरोजगार तरुणांना आयपीएल संघांच्या जर्सी दिल्या होत्या. याशिवाय त्यांनी पंच, वॉकी-टॉकी आणि पाच एचडी कॅमेरेही वापरले होते. यासोबतच सामने वास्तवदर्शी वाटावेत म्हणून ‘अॅम्बियन्स साऊंड’ देखील वापरण्यात आला होता. कहर म्हणजे त्यांनी क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंची नक्कल करण्यासाठी मेरठहून एक व्यक्तीही बोलवली होती.

हेही वाचा – Wimbledon 2022: “हे काही सोपे काम नाही!” नोव्हाक जोकोविचच्या कामगिरीवर ‘मास्टर ब्लास्टर’ने दिली खास शाब्बासकी

मेहसाणातील पोलीस अधिकारी भावेश राठोड यांनी सांगितले की, ‘रशियातील प्रसिद्ध पबमध्ये आठ महिने काम करून मोलीपूरला परतलेल्या शोएब दावडा वन्नाडा नावाची व्यक्ती कर्ताधर्ता आहे. शोएबने गुलाम मसीह नावाच्या व्यक्तीचे शेत भाड्याने घेतले होते. तिथे हॅलोजन दिवे लावून आणि २१ शेतमजुरांना प्रति सामना ४०० रुपये देण्याचे आश्वासन देऊन ही बनावट लीग सुरू केली होती’.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे रशियापर्यंत पोहचलेले असल्याने याचा अधिक तपास केला जात आहे.

Story img Loader