ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी सलग तीन दिवस जागरण केल्यामुळे चीनमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते.
येथील वेळेनुसार सामन्यांचे प्रसारण मध्यरात्री होत असल्यामुळे शांघायमधील एका ३९ वर्षीय फुटबॉल चाहत्याने सलग तीन दिवस जागरण केले. सलग तीन दिवसांच्या जागरणामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती ईस्टर्न डेलीने दिली आहे. उच्च रक्तदाब आणि अतिताण यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आले आहे. तसेच नातेवाईकांनी देखील तो फुटबॉलचा चाहता असून फुटबॉलच्या वेडामुळे गेले तीन दिवस त्याच्याकडून जागरण झाले असल्याचे सांगितले.
दुसरीकडे सुझाऊ शहरामध्ये एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह संगणकासमोर आढळून आला आहे. त्याच्या संगणकावर चिली आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील फुटबॉलचा सामना सुरू होता असे सांगण्यात आले आहे, तर एका फुटबॉल चाहत्याचा स्पेन विरुद्ध नेदरलँड सामना पाहताना हृद्यविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे समजते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या आठवड्याभरात रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांच्या संख्येत पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातील ४० टक्के रुग्णांना अवेळी खाणे, अपूरी झोप यामुळे अशक्तपणा आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.