मुंबई : भारतात दाखल झाल्यापासून सर्वांचा उत्साह आणि प्रेम पाहून मी भारावलो आहे. चाहत्यांचा पाठिंबा नेहमीच आम्हाला कामगिरी उंचावण्यास मदत करतो. त्यामुळे चाहत्यांने मनापासून आभार, असे ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. भारतीय संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक ही ‘एनसीपीए’ ते वानखेडे स्टेडियम अशी काढण्यात आली. त्यानंतर वानखेडेवर झालेल्या विशेष सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ‘बीसीसीआय’तर्फे संघाला १२५ कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘गेली ११ वर्षे आम्ही ‘आयसीसी’ जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर आम्ही विश्वचषक भारतात आणण्यात यशस्वी झालो. प्रत्येक विश्वचषक जेतेपद हे महत्त्वाचे आहे. आम्ही २००७ मध्ये जगाला ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेतेपद कसे मिळवतात हे दाखवून दिले. २०११ मध्ये भारताने वानखेडे स्टेडियममध्ये विश्वचषक उंचावला आणि त्यानंतर इंग्लंड येथे २०१३ मध्ये आपण चॅम्पियन्स करंडक जिंकला. ही सर्व जेतेपदे संघासाठी विशेष आहेत,’’ असे रोहित म्हणाला.

हेही वाचा >>>रोड शोनंतर मरीन ड्राईव्हची कशी आहे परिस्थिती? चपलांचा ढीग अन्… VIDEO मध्ये पाहा क्वीन नेकलेसवरील सद्यस्थिती!

सूर्यकुमारच्या निर्णायक झेलबाबत रोहितने सांगितले की, ‘‘तो झेल सूर्यकुमारचाच होता. सामन्यात दडपणाखाली असा झेल पकडणे खूप अवघड आहे. सरावात सर्व खेळाडू अशाच झेलचा सराव करत असतात. त्याचा हा झेल खरोखर सामन्याला कलाटणी देणारा होता.’’

वानखेडे माझ्यासाठी विशेष बुमरा

वानखेडे स्टेडियम माझ्यासाठी विशेष आहे. येथे खऱ्या अर्थाने माझ्या क्रिकेट कारकीर्दीला कलाटणी मिळाली, असे जसप्रीत बुमरा म्हणाला. ‘‘मी विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या मुलाला पाहिले. त्यानंतर मला अश्रू अनावर झाले,’’ असे बुमराने सांगितले.

रोहितला इतका भावूक पाहिलेे नव्हते विराट

गेल्या १५ वर्षांत मी रोहितला इतका भावूक पाहिलेले नव्हते. आम्ही जेव्हा बार्बाडोस येथील मैदानातील पायऱ्या चढत होतो, तेव्हा आम्हा दोघांना अश्रू अनावर झाले, असे विराट कोहली वानखेडे येथील आयोजित कार्यक्रमादरम्यान म्हणाला. वयाच्या २१व्या वर्षी याच वानखेडेवर कोहलीने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जेतेपद मिळवले होते. ‘‘मी आता ३५ वर्षांचा आहे. मी आणि रोहितने जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा विश्वचषक वानखेडेवर आणला. त्यामुळे मला अधिक आनंद आहे,’’ असे कोहलीने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan support motivates the team twenty 20 world cup captain rohit sentiments amy
Show comments