Virat Kohli Vs Babar Azam Fan Video : विराट कोहली आणि बाबर आझम ही दोन्हीही क्रिकेटच्या दुनियेतील मोठी नावे आहेत. या दोन फलंदाजांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. पण या दोघांपैकी नेमका कोणता खेळाडू सर्वोत्तम आहे याबद्दल नेहमीच वाद होत आले आहेत. बऱ्याचदा विराटच्या पारड्यात चाहत्यांचे जास्त प्रेम पडल्याचे पाहायला मिळते.

यादरम्यान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये एका क्रिकेट चाहत्याला एका भारतीय पत्रकाराने विराट कोहली माहिती आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्या मुलाने दिलेले उत्तर चर्चेचा विषय बनला आहे. हा मुलगा म्हणाला की, “किंग कोहली, परवा त्याने १४००० चे रेकॉर्ड बनवलं… बाबर आझमचा बाप (किंग कोहली, परसों उसने १४ हजार का रेकॉर्ड बनाया, बाबर आझम का बाप), ” असं उत्तर दिलं. ही व्हिडीओ पाकिस्तानमधील लाहोर येथे अफगाणिस्तान आणि इंग्लड यांच्यादरम्यान झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यावेळीचा असल्याचे सांगितले जात आहे.

विराट कोहलीची लोकप्रियता सीमेच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पाकिस्तानात देखील आहे. खाही दिवसांपूर्वी दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानमधील लोकांचे विराटबद्दलचे प्रेम पाहायला मिळाले. पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या पराभवानंतरही, २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी चाहते कोहलीने शतक पूर्ण केल्यानंतर आनंद व्यक्त करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट आणि बाबरची कामगिरी

सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत, बांगलादेशविरुद्ध खराब सुरुवात केल्यानं कोहलीने पाकिस्तान विरोधातील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत शतक झळकावले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध कोहलीने ३८ चेंडूत फक्त २२ धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानविरोधात अत्यंत संयमी खेळी खेळत त्याने भारतीय संघाला विजयापर्यंत पोहचवले. स्पर्धेत खेळलेल्या दोन डावांमध्ये कोहलीने १२२ च्या सरासरीने १२२ धावा केल्या आहेत.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ९० चेंडूत केलेल्या ६० धावा केल्यानंतर बाबर आझमवर जोरदार टीका झाली. या सामन्यात पाकिस्तानी संघाला पराभव पत्करावा लागला. तर भारताविरुद्ध बाबर फक्त २३ धावाच करू शकला. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत दोन डावांनंतर त्याने ४३.७५ च्या सरासरीने एकूण ८७ धावा केल्या आहेत.

Story img Loader