भारताच्या वनडे आणि टी-२० संघाचा कप्तान रोहित शर्मा आधुनिक युगातील क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. ‘हिटमॅन’ म्हणून ओळख असलेल्या रोहितचा पुल शॉट जगप्रसिद्ध आहे. षटकारा पडण्याच्या गतीमुळे गोलंदाज त्याच्याविरुद्ध शॉर्ट चेंडू टाकण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. एक अनुभवी आणि वरिष्ठ भारतीय क्रिकेटर असल्याने, रोहित शर्मा अनेकदा युवा क्रिकेटपटूंना टिप्स देतो. अलीकडे आता अंडर-१९ वर्ल्डकप खेळत असलेल्या भारतीय संघासोबत दिसला होता. रोहितने संघातील युवा खेळाडूंना प्रोत्साहनही दिले होते. केवळ क्रिकेटपटूच नाही तर रोहित चाहत्यांनाही फलंदाजीबाबतीत टिप्स देतो.
सोशल मीडियावर एका चाहत्याने रोहितला पुल शॉट कसा खेळावा, याबद्दल सल्ला विचारला. तेव्हा रोहितने या चाहत्याला ट्वीटद्वारे उत्तर दिले. बुधवारी एका ट्विटर यूझरने रोहित शर्माला टॅग केले आणि त्याचा पुल शॉट सुधारण्यासाठी मदत मागितली.
या यूझरने ट्वीट करून लिहिले, “रोहित शर्मा, पुल शॉट सुधारण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. जेव्हा मी तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझी शक्ती कमी पडते.” हिटमॅनने या चाहत्याला प्रत्युत्तर देताना लिहिले, “काळजी करू नकोस, जर गोलंदाजाने शॉर्ट चेंडू टाकला तर फक्त बॅटने चेंडूला स्लाइस कर. मुंबई इंडियन्स तुमचे यावर मत काय?”
हेही वाचा – IND vs SA: केवळ ९ धावा दूर… विक्रमादित्य सचिनचा तो विराट विक्रम मोडण्याची कोहलीला संधी
मुंबई इंडियन्सने रोहितच्या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी रोहितचाच एक व्हिडिओ शेअर केला. रोहित दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.