SA20 2025 Fan wins 90 lakhs by catching with one hand : न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या एसएट्वेन्टी मध्ये दिसत आहे. किवी फलंदाज या स्पर्धेत डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे. विल्यमसनने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात एक शानदार षटकार ठोकला. जो थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहोचला, जिथे एका प्रेक्षकाने एका हाताने झेल घेऊन सुमारे ९० लाख रुपये जिंकले. ज्याची सध्या या सामन्यापेत्रा खूप चर्चा आहे. नक्की त्या प्रेक्षकांने ९० लाख रुपये कसे जिंकले? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्पर्धेतील दुसरा सामना डर्बन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०९ धावा केल्या होत्या. यादरम्यान केले विल्यमसनने ४० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६० धावांची सर्वाधिक धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान विल्यमसनने लेग साइडवर एक उत्तुंग षटकार मारला, जो प्रेक्षक गॅलरीत पोहोचला जिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याने तो चेंडू एका हाताने पकडला.

एका हाताने कॅच घेतल्याने चाहत्याला मिळाले ९० लाख रुपये –

या कॅचसाठी चाहत्याला २० लाख दक्षिण आफ्रिकन रँड म्हणजेच सुमारे ९० लाख रुपये मिळाले. या लीगच्या नियमांनुसार, १८ वर्षांवरील प्रेक्षकाला एका हाताने षटकाराचा क्लीन कॅच घेणाऱ्यांना १० लाख रँडचे बक्षीस ठेवले आहे. विशेष म्हणजे जर झेल घेणारा चाहता सामन्यापूर्वीच शीर्षक प्रायोजकाचा ग्राहक असेल, तर त्याची बक्षीस रक्कम दुप्पट केली जाते. या झेलवर समालोचक मार्क निकोल्स म्हणाले, ‘हा चाहता क्रिकेट खेळतो का? जर खेळत असेल तर बक्षिसाची रक्कम तिप्पट करा. हा एक अप्रतिम झेल आहे.’

हेही वाचा – BPL 2025 : ‘तू अजूनही ड्रग्ज घेतोस का?’, सामन्यानंतर तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्समध्ये मैदानातच जुंपली

डर्बन सुपर जायंट्सने मारली बाजी

या सामन्याबद्दल बोलायचे तर डर्बन सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून २०९ धावा केल्या. केन विल्यमसनने ४० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. सलामीवीर ब्राइस पर्सन्सने २८ चेंडूत ४७ धावा केल्या तर मुल्डरने १९ चेंडूत ४५ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली होती. प्रत्युत्तरात प्रिटोरिया कॅपिटल्सचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने ४३ चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत ७ षटकारांचा समावेश होता. विल जॅकसोबत (३५ चेंडूत ६४ धावा) त्याने पहिल्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे ९ विकेट्स हातात असूनही शेवटच्या ४७ चेंडूत केवळ ५६ धावाच करता आल्या. संघाने हा सामना २ धावांनी गमावला. शेवटच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती, पण कॅपिटल्सचे फलंदाज केवळ ११ धावाच करू शकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan who caught kane williamson sixer with one hand wins rs 90 lakh prize in sa20 2025 match vbm