Dolly Chaiwala Indian Hockey Team : हल्ली समाजमाध्यमं कोणाला सेलिब्रेटी बनवतील याचा काही नेम नाही. डॉली चायवाला नावाचा नागपूरमधील एक चहा विक्रेता समाजमाध्यमांमुळे सेलिब्रेटी झाला आहे. त्यामुळे, चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक बिल गेट्स देखील त्याच्या चहाच्या टपरीवर जाऊन आले. तसेच इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्ती डॉली चायवालाच्या टपरीवर जाऊन चहा पिऊन आले आहेत. त्यामुळे डॉली चायवाल्याचाही मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. डॉली इतका प्रसिद्ध झाला आहे की तो आणि ऑलिम्पिक पदक जिकून भारतात परतलेल्या भारतीय हॉकी संघाचे खेळाडू एकाच वेळी विमानतळावर दिसल्यानंतर चाहत्यांनी डॉलीभोवती मोठी गर्दी केली. मात्र, डॉलीभोवती गर्दी करणाऱ्यांपैकी कोणीही ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंना ओळखलं नाही. भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना ही गोष्ट विचित्र वाटली.

भारतीय पुरुष हॉकी संघ तब्बल ४१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २०२१ मध्ये (टोक्यो ऑलिम्पिक) पहिल्यांदाच ऑलिम्पिक पोडियमवर पोहोचला. भारतीय संघाने कांस्य पदक पटकावलं होतं. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. परंतु, पदक जिंकून परत येणाऱ्या संघातील काही खेळाडूंबरोबर अशी घटना घडली जी त्यांना रुचली नाही. हे खेळाडू विमानतळावर दाखल झाले, त्याच वेळी डॉली चायवाला देखील तिथेच होता. डॉलीबरोबर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. मात्र, या सर्वांनी हॉकी संघातील खेळाडूंना ओळखलंही नाही. हे पाहून खेळाडूंना खूप विचित्र वाटलं. भारतीय हॉकी संघातील आघाडीचा खेळाडू हार्दिक सिंग याने एका यूट्युब पॉडकास्टवर बोलताना या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा >> वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील

विमानतळावर नेमकं काय घडलं

हार्दिक सिंग म्हणाला, “विमानतळावर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हरमनप्रीत सिंग, मी, मनदीप सिंग आणि इतर काही असे मिळून आम्ही पाच ते सहा जण तिथे होतो. डॉली चायवाला देखील तिथेच होता. लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती. त्याचे फोटो काढत होते. त्याच्याबरोबर सेल्फी काढत होते. मात्र त्यांच्यापैकी कोणी आम्हाला ओळखलं नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि त्या प्रकाराकडे दुर्लक्ष कलं”.

हे ही वाचा >> IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक ८ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्य पदकं जिंकली आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकलं होतं. यासह भारतीय हॉकी संघाने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती केली.

Story img Loader