ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झालीय. मागील अनेक दिवसांपासून या घोषणेसंदर्भात चर्चा होत असतानाच बुधवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी १८ खेळाडूंचा समावेश असणारा संघ जाहीर केलाय. या १८ पैकी ३ खेळाडू हे राखीव असून एकूण १५ जणांचा चमू या दौऱ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहरचा समावेश आहे. बीसीसीआयने टी २० विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केल्यानंतर क्रिकेटमधील जाणकार आणि चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. या संघामध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलं आहे. मागील चार वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर असणाऱ्या अश्विनला संधी देत सध्या चांगली कामगिरी करणाऱ्यांना डावलल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

हर्षा भोगले, आकाश चोप्रा यासारख्या क्रिकेटच्या जाणकारांनी बीसीसीआयने शार्दूल ठाकूर आणि दीपक चहरला संघात स्थान न देता राखीव खेळाडू म्हणून निवडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. शार्दूलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली आणि गोलंदाजीतही छाप पाडताना दुसऱ्या डावात रॉरी बर्न्‍स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा अडसर दूर केला.  शार्दूल ठाकूर सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेमध्ये चमकदार कामगिरी करतोय. नुकत्याच ओव्हलवर झालेल्या सामन्यात शार्दूलने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भन्नाट कामगिरी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं.

नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी

दीपक चहरनेही भारताने नुकताच केलेल्या श्रीलंकन दौऱ्यादरम्यान चांगली फलंदाजी केली होती. असं असतानाही या दोघांना संघाबाहेर ठेवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पृथ्वीची गेल्या वर्षभरातील कामगिरी लक्षवेधी होती. ‘आयपीएल’मध्ये दुखापत झालेल्या आक्रमक श्रेयसची कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधू शकली नाही.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

हर्षा भोगले यांनी फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतील या विचाराने संघाची निवड करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

तसेच हर्षा यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

आकाश चोप्रा यांनी पाच फिरकी गोलंदाज, तीन वेगवान गोलंदाज आणि हार्दिक पांड्या असं कॉम्बिनेशन असल्याचं दर्शवत दीपक चहारला वगळ्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय.

चाहत्यांनीही त्यांची मतं मांडलीय. शूर्दूलला पटेलऐवजी संधी द्यायला हवी होती असं एकाने म्हटलं आहे.

तर अन्य एकाने शार्दूल मुख्य संघात हवा होता असं म्हटलंय.

यंदा १७ ऑक्टोबरपासून अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे त्रिकूट वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तसेच अष्टपैलू हार्दिक पंडय़ा हा आणखी एक वेगवान गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध आहे. अमिरातीमधील खेळपट्टय़ा फिरकीसाठी अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे अश्विनचे तब्बल चार वर्षांनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्यासह रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर अशी फिरकीची फळी भारताने निवडली आहे. तसेच राखीव यष्टीरक्षक म्हणून ईशान किशनला पसंती देण्यात आली आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत!

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाच्या (मेंटॉर) भूमिकेत दिसणार आहे. दोन विश्वचषक विजेत्या धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तो पुन्हा भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात धोनी भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडेल. मी त्याच्याशी दुबई येथे चर्चा केली होती. या स्पर्धेत मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. त्यानंतर मी माझे सहकारी, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केली. धोनीमुळे भारतीय संघाला फायदा होईल यावर आमचे एकमत झाले,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह म्हणाले.

नक्की वाचा >> T20 World Cup: निवृत्तीनंतरही टीम इंडियामध्ये धोनीचं ‘सिलेक्शन’; ‘या’ निर्णयामागील रजनीकांत कनेक्शन माहितीय का?

विराटकडे लक्ष

टी २० विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच धोनी वगळता इतर कोणताही खेळाडू भारताचे नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही पहिलीच टी-२० विश्वचषक स्पर्धा असणार आहे. भारतीय संघाने २००७ नंतर टी २० विश्वचषक जिंकलेला नाही. इतकच नाही तर २०१३ नंतर भारताने आतापर्यंत आयसीसीचा एकही चषक जिंकलेला नाही. दुसरीकडे विराट कोहली त्याच्या नेतृत्वामध्ये अद्याप आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेला नाही. त्यामुळेच विराटच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. आधी ही मालिका भारतात खेळवली जाणार होती. मात्र करोना रुग्णसंख्या लक्षात घेता ही मालिका ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान आयोजित करण्यात आलीय.

नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा

भारतीय संघ

’  फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव

’  यष्टीरक्षक : ऋषभ पंत, ईशान किशन

’  अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा

’  वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

’  फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

’  राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर