न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करत भारताचा संपूर्ण संघ गारद केला. कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेत एजाजने मोठा पराक्रम केला. यासह त्याने भारताच्या अनिल कुंबळेची बरोबरी केली. त्यानंतर एजाज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. एजाजचा जन्म हा मुंबईचा आहे आणि मायभूमीत हा पराक्रम केल्यानंतर नेटिझन्सनी त्याच्याबद्ल एका वेगळ्या चर्चेला उधाण दिले आहे.
वानखेडेवर रचलेल्या विक्रमानंतर आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स एजाजला आपल्या ताफ्यात सामील करणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. आयपीलएलच्या आगामी पर्वासाठी मोठा लिलाव होणार आहे, यात एजाज मुंबईसाठी खेळू शकतो. मुंबईने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंना कायम ठेवले असून इतर खेळाडूंना लिलावात उतरवले आहे. त्यामुळे मुंबईत नव्या खेळाडूंची भरणा होऊ शकते. अशात एजाज जर मुंबईत आला, तर संघाला एक दमदार फिरकी गोलंदाज मिळेल हे नक्की.
अनिल कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.
हेही वाचा – ज्या मुंबईत जन्माला आलो तिथं ही कामगिरी करण्याचं समाधान – एजाज पटेल
१९५६मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि १९९९मध्ये कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते. एजाजने १० बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा एजाजने मोडीत काढला.