हॅमिल्टन येथे भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. संजू सॅमसनला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. पहिल्या वनडेत चांगली कामगिरी करूनही सॅमसनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे. त्याच्या जागी दीपक हुडाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सॅमसनचे सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संजू सॅमसनला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली होती. कारण या अगोदर ही तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याला एकदा ही संधी मिळाली नव्हती. त्यानंतर भारतीय संघावर खूप टीका झाल्यानंतर, त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात संजू सॅमसनने ३८ चेंडूचा सामना करताना ३६ धावांचे योगदान दिले होते. त्याने या खेळीत ४ चौकार लगावले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये संजू सॅमसनला संधी मिळाली नाही, त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत कॅप्टन धवन आणि ऋषभ यांची खरडपट्टी केली आहे. पंतला पहिल्या वनडेत २३ चेंडूत केवळ १५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर संजू सॅमसनला बांगलादेश दौऱ्यात संधी मिळालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळाली, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती.
याआधी आशिया चषक आणि नंतर टी-२० विश्वचषकातही निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास ठेवला नाही. त्याचवेळी सॅमसनविरुद्ध घाणेरडे राजकारण खेळले जात असल्याने त्याला संघात स्थान दिले जात नसल्याचे चाहत्यांचे मत आहे. २०१५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सॅमसनकडे नेहमीच कानाडोळा करण्यात आला आहे. सॅमसनने २०१२ पासून फक्त 16 सामने खेळले आहेत, तर पंतने त्याच्यानंतर २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून ६५ हून अधिक सामने खेळले आहेत.