देशभरात काल शिक्षक दिन साजरा केला गेला. मान्यवर व्यक्तींपासून अनेक लोकांनी आपल्या शिक्षकांचे आभार व्यक्त केले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपले प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना शुभेच्छा देण्यासाठी एका डिजिटल फिल्मची निर्मितीही केली. ‘I Hate My Teacher’ या शीर्षकाखाली केलेल्या या व्हिडिओला काल दिवसभर नेटिझन्सनी चांगली पसंती दर्शवली. आपलं करियर घडवण्यात गोपीचंद सरांचा कसा हात आहे, हा संदेश सिंधूने आपल्या व्हिडिओतून दिला होता.

अवश्य वाचा – मला माझे प्रशिक्षक आवडत नाहीत – पी.व्ही.सिंधू

यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही काल शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करणारा एक मेसेज आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. मात्र नेटिझन्सनी त्याच्या या मेसेजची चांगलीच खिल्ली उडवली. अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादावरुन काही जणांनी विराटला चांगलंच ट्रोल केलं.

चॅम्पियन्स करंडकाआधी विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे संपूर्ण क्रिकेटविश्व ढवळून निघालं होतं. कुंबळे यांची प्रशिक्षणाची शैली आपल्याला मान्य नसून, रवी शास्त्री यांच्या नावासाठी कोहलीने बीसीसीआयकडे शिफारस केली होती. यानंतर प्रशिक्षक निवडीचे अधिकार असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. यानंतर कुंबळे-कोहली वादावर पडदा पडला होता.

अवश्य वाचा – शिक्षक दिन विशेष – आचरेकर सरांचा ‘हा’ धडा कधीच विसरणार नाही – सचिन

मात्र या प्रकरणानंतर भारतीय चाहते हे कोहलीवर चांगलेच नाराज झाले आहेत. ज्या प्रकारे अनिल कुंबळे यांना भारतीय क्रिकेटमधून बाहेर पडावं लागलं, त्याबद्दल आताही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात विराट कोहलीबद्दल नाराजी आहे. वारंवार याचा प्रत्यय सोशल मीडियावर येतच असतो. त्यामुळे शिक्षकदिनाचं सेलिब्रेशन विराट कोहलीला सध्या चांगलंच महागात पडलंय, असं म्हणायला हरकत नाही.