दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने काल शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१८ मध्ये, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले, परंतु त्यानंतर तो अनेक क्रिकेट लीग खेळत राहिला, ज्यामध्ये आयपीएल अव्वल ठरले. मात्र, आता त्याने क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती जाहीर केली असून त्यामुळे तो यापुढे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार नाही.
एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आणि आभार मानले. भारतीय संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज परविंदर अवानाने एक ‘अपमानास्पद’ व्हिडिओ ट्वीट करत डिव्हिलियर्सचे क्रिकेटमधील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. अवानाने आयपीएलचा एक जुना व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये त्याने एबीला क्लीन बोल्ड केले. त्याच्या या पोस्टवर खवळलेल्या नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडिओच्या खाली एका दर्शकाने त्याला ट्रोल करणारा व्हिडिओ टाकला आणि लिहिले की, एबी डिव्हिलियर्सला क्लीन बोल्ड करण्यापूर्वी तुला षटकार मारला होता. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स शेवटी फलंदाजीला आला आणि त्याने परविंदर अवानाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला पण पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला.
हेही वाचा – ये डर होना चाहिए..! डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर राशिद खानची पोस्ट व्हायरल; म्हणाला, ‘‘दिलासादायक गोष्ट…”
परविंदर अवाना भारताकडून २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान त्याला एकही विकेट घेण्यात अपयश आले. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने आयपीएलमध्ये ३३ सामन्यांत ३९ विकेट घेतल्या होत्या. यादरम्यान त्याने विराट कोहली ते एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गज फलंदाजांना बाद केले.