सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटविश्वाचे आराध्य दैवत. क्रिकेटविश्वात गेली २४ वर्षे अव्याहतपणे धावांचा रतीब घालताना असंख्य विक्रमांची गवसणी घालणारा सचिन वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. सचिनला याचि देहा याचि डोळा पाहण्याची संधी मिळावी यासाठी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हजारो प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. सचिनला मैदानावर खेळताना प्रत्यक्ष पाहण्याची ही दुर्मीळ संधी आहे हे ओळखूनच सचिनचे चाहते सामना सुरू होण्याच्या दोन तास आधीपासूनच ईडन गार्डन्सच्या परिसरात दाखल झाले.
ईडन गार्डन्सच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सचिनच्या भव्य पोस्टरने त्यांचे स्वागत केले. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रम घ्या, कारण स्वप्नं खरी होतात, हे सचिनचे उद्गार पोस्टरवर रेखाटण्यात आले होते. नाणेफेकीच्या वेळी सचिन सचिनच्या नाऱ्याने वातावरण दुमदुमले होते, मात्र नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीने जिंकला आणि त्याने फलंदाजीचा निर्णय घेताच असंख्य सचिन चाहते हिरमुसले. मैदानावर सचिन दिसेल, परंतु पहिल्या दिवशी सचिनच्या फलंदाजीचा आस्वाद घेता येणार नाही म्हणून ते हिरमुसले. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये अपवादाने गोलंदाजी करणाऱ्या सचिनला धोनीने गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि दुसऱ्याच षटकांत विकेट मिळवली. सचिनने शिलिंगफोर्डला बाद करताच संपूर्ण ईडन गार्डन्स सचिन सचिनचा जयघोष करत होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा