प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. अगदी कला आणि क्रीडाक्षेत्रही त्याला अपवाद नाही. एखादे नाटक, मालिका किंवा एखाद्या खेळाडूची कारकीर्द या प्रत्येकापुढे पूर्णविराम असतो. खेळाडूने आपली कामगिरी आणि तंदुरुस्ती सांभाळत योग्य वेळी खेळाला अलविदा केला तर चाहते त्याला डोक्यावर घेतात, अन्यथा त्याच्या निवृत्तीसाठी त्याचा पिच्छा पुरवतात. गेल्या काही महिन्यांत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या निवृत्तीने सारे जग हेलावले. पण काही महान क्रिकेटपटूंच्या अखेरच्या सामन्यांचा विचार केला तर त्यामधून अनेक संस्मरणीय रंग उलगडतात.
नोव्हेंबर महिन्यातील मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवृत्ती क्रिकेटविश्वासाठी हृदयस्पर्शी होती. ज्याने जवळपास २५ वर्षे क्रिकेटजगताला अपार, अवीट आनंदाची गोडी दिली, त्याला वानखेडेवर निरोप देताना चाहते अधिक भावूक झाले होते. सचिनने अर्धशतक झळकावल्यावर तो शतकाच्या दिशेने कूच करताना प्रत्येक धावेचे प्रेक्षक स्वागत करीत होते. पण अनपेक्षितपणे त्याच्या बॅटची कडा घेऊन शिलिंगफोर्डचा चेंडू पहिल्या स्लीपमधील डॅरेन सॅमीच्या हातात विसावला आणि स्टेडियम स्तब्ध झाले, स्मशानशांतता पसरली. पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना सचिनने साऱ्या प्रेक्षकांना अभिवादन केले, तेव्हा सारे स्टेडियम ‘सचिन.. सचिन..’ च्या नादाने दुमदुमून उठले. सामना संपल्यावर सचिनने जे भाषण केले, तेव्हा त्याचे आणि चाहत्यांचेही डोळे पाणावले. क्रिकेटला निरोप देताना सचिनने खेळपट्टीला वाकून नमस्कार केला आणि सचिन हे काय अजब, अद्भुत, संस्कारक्षम, भावनापूर्ण रसायन आहे, याचा प्रत्यय सर्वाना आला. या सामन्यात शतक पूर्ण न केल्याची खंत सचिनला असेलही, पण निवृत्तीची घोषणा करून अंतिम सामना घरच्या मैदानात खेळण्याचे भाग्य मात्र त्याला लाभले. तसे भाग्य सुनील गावस्कर, कपिलदेव, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या भारतातील महान क्रिकेटपटूंना लाभले नाही.
गावस्कर अखेरचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळले, ज्यामध्ये त्यांचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते. कपिलदेव यांनी भारताला पहिलावहिला विश्वचषक जिंकून दिला. भारताला कपिलच्या रूपात सामना जिंकून देण्याची क्षमता असलेला पहिला अष्टपैलू खेळाडू मिळाला. पण त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस मात्र त्यांचा वेग मंदावला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. अखेर श्रीलंकेच्या हशन तिलकरत्नेला त्यांनी बाद केले आणि त्यानंतर कारकिर्दीला अलविदा केला. राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांना तर मैदानात निवृत्ती घेण्याचे भाग्य लाभले नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वाधिक त्रिफळा उडाल्याचे खापर फोडले गेल्यामुळे द्रविडने भारतात आल्यावर निवृत्ती जाहीर केली. या दौऱ्यानंतर लक्ष्मणच्या घरच्या मैदानावर कसोटी सामना होणार होता, त्याला या सामन्यानंतर निवृत्ती घ्यायची होती. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याचा दूरध्वनीच उचलला नाही आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ कसोटीपटू लक्ष्मणला सामन्याआधीच निवृत्ती घ्यावी लागली.
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी निवृत्तीचा सामना तर अनपेक्षित धक्का होता. ब्रॅडमन यांनी कारकिर्दीमध्ये धावांच्या राशी उभ्या केल्या होत्या. अखेरच्या डावापूर्वी त्यांची सरासरी होती ९९.९४. जर त्यांनी अखेरच्या डावात चार धावा केल्या असत्या तर त्यांच्या सरासरीने शंभरी गाठली असती. पण कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यामध्ये त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांना इंग्लंडचे ‘लेग स्पिनर’ इरिक होलिज यांचा चेंडू दिसला नाही. त्या चेंडूवर त्यांनी आपली विकेट शून्यावर गमावली. एका महान क्रिकेटपटूच्या कारकिर्दीची अखेर अशी दुर्दैवी व्हावी, याला काय म्हणणार. पण ऑस्ट्रेलियाचे दोन महान गोलंदाज शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांची निवृत्ती सुफळ संपूर्ण अशीच ठरली. २००६-०७ च्या अॅशेस मालिकेतील ‘बॉक्सिंग डे’च्या सामन्यानंतर त्यांनी निवृत्ती जाहीर केली. अखेरचा सामना हा सिडनीला होणार होता. या आपल्या अखेरच्या सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर ग्लेन मॅकग्राने बळी मिळवला, तर वॉर्नने या सामन्यात इंग्लंडच्या अॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफला तंबूची वाट दाखवत ७०८व्या विक्रमी बळींसहीत निवृत्ती जाहीर केली. या दोघांच्या अतुलनीय कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना तर जिंकलाच, पण मालिकेत इंग्लंडवर ५-० असा दणदणीत विजय मिळवला.
मुथय्या मुरलीधरन या जिगरबाज फिरकीपटूची निवृत्ती ही त्याच्या दर्जाला साजेशी झाली. भारताविरुद्ध गॉल येथे अखेरचा सामना खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले, त्यावेळी त्याला आठशे बळींचा टप्पा गाठण्यासाठी ८ बळींची गरज होती. भारतासारख्या फिरकीला सहजपणे खेळणाऱ्या संघासमोर आठशे बळींचा टप्पा मुरली गाठणार का, याबाबत चर्चाना उधाण आले होते. पण मुरलीने हे आव्हान स्वीकारले आणि आठ बळी सहजपणे मिळवत आठशे बळींसह क्रिकेटविश्वाला अलविदा केला.
एकेकाळी वेस्ट इंडिजची क्रिकेटवर मक्तेदारी होती. पण विंडीजमधील महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट चांगला झाला नाही. सर गॅरी सोबर्स यांना आपल्या अखेरच्या कसोटीत पहिल्या डावात एकही धाव करता आली नाही, तर दुसऱ्या डावात त्यांना २० धावा करता आल्या. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर विव्हियन रिचर्ड्स यांची तर संघातून हकालपट्टी करण्यात आली होती. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर त्यांना संघात न घेण्याचे राजकारण घडले आणि हा महान खेळाडू मैदानात क्रिकेटला अलविदा करण्यापासून वंचित राहिला. वेस्ट इंडिजचे सर्वात यशस्वी कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांना अखेरच्या एकदिवसीय सामन्यात २५ धावाच करता आल्या, तर हा सामना विंडीजला गमवावा लागला होता. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्याही क्रिकेट कारकिर्दीचा अंत वाईटच झाला. १९ एप्रिल २००७च्या विश्वचषकात त्याने निवृत्तीची घोषणा केली आणि २१ एप्रिलला इंग्लंडविरुद्ध अखेरचा सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला, पण त्याला दैवाने साथ दिली नाही. १८ धावांवर असताना त्याला मार्लन सॅम्युअल्सने धावचीत केले आणि एका महान फलंदाजांच्या कारकिर्दीचा दुर्दैवी शेवट झाला.
पाकिस्तानचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू इम्रान खान याने अनेकदा निवृत्ती घेतली आणि अनेकदा तो संघात परतला. पण १९९२च्या विश्वचषकापूर्वी जावेद मियाँदादच्या नेतृत्वावर नाराज पाकिस्तानी खेळाडूंनी बंड केले आणि इम्रानला संघात परतावे लागले. या विश्वचषकानंतर तो निवृत्ती घेणार असल्याचे जगजाहीर होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इम्रानने ७२ धावांची खेळी साकारली आणि संघाने त्याला विश्वचषकाची भेट दिली. पाकिस्तानचा आणखी एक महान वेगवान गोलंदाज वसिम अक्रमला निवृत्ती घेण्याची संधीच पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दिली नाही. ५०० बळी मिळवणाऱ्या या गोलंदाजावर सामना निश्चितीचे आरोप ठेवून त्याला संघातून हद्दपार करण्यात आले. न्यूझीलंडचे महान क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली यांनी मात्र निवृत्तीच्या सामन्यात कमालच केली. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्यांनी ८६ धावा करत पाच बळी मिळवले आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
जगाला क्रिकेटचे धडे दिले ते इंग्लंडने. क्रिकेटला अधिक बळकट करून, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात सर सी. जी. ग्रेस यांचा मोलाचा वाटा होता. पण त्यांनाही आपली निवृत्ती मैदानावर घेण्याचे भाग्य लाभले नाही. इंग्लंडचे महान अष्टपैलू खेळाडू इयान बोथम यांनी इंग्लंडला बरेच विजय मिळवून दिले खरे, पण अखेरच्या सामन्यामध्ये त्यांना जास्त काहीच करता आले नाही. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांना पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ६ धावा करता आल्या. इंग्लंडचे भरवशाचे माजी फलंदाज माइक गेटिंग यांनाही अखेरच्या सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्यांना पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही, तर दुसऱ्या डावात त्यांना फक्त आठच धावा करता आल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसने आपला निवृत्तीचा सामना शतक झळकावून गाजवला. भारताविरुद्धच्या दरबान येथील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये त्याने ११५ धावांची अप्रतिम खेळी साकारली आणि संघानेही त्याला मालिका विजयाची भेट दिली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने असाच खास अलविदा महान गोलंदाज शॉन पोलॉकही दिला होता. वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना सहज जिंकणार असे वाटल्यावर त्याला फलंदाजीसाठी तिसऱ्या स्थानावर पाचारण करण्यात आले, याचा त्याने चांगलाच फायदा उठवत आपल्या अखेरच्या धावेने संघाला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला.
कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना संस्मरणीय करण्याचे भाग्य फार थोडय़ा क्रिकेटपटूंना लाभले. परंतु हॅडली, कॅलिससारख्या काही क्रिकेटपटूंनी कोणतेही दडपण न घेता आपला लौकिक सार्थ ठरवला आणि बाणेदारप्रमाणे क्रिकेटजगताचा निरोप घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा