लखनऊ : संघ सहकारी युकी भाम्ब्रीच्या साथीत रोहन बोपण्णाने डेव्हिस चषक लढतीत दुहेरीची लढत जिंकून कारकीर्दीची विजयी अखेर केली. त्यानंतर सुमित नागल आणि दिग्विजय प्रताप सिंह यांनी परतीच्या एकेरीच्या लढतीत बाजी मारताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जागतिक गट-२ मधील लढतीत भारताने घरच्या कोर्टवर खेळताना मोरोक्कोचा ४-१ असा पराभव केला. या निर्णायक कामगिरीसह भारताने रोहन बोपण्णाला विजयी निरोप दिला. या विजयाने भारत आता पुढील वर्षी जागतिक गट-१ मध्ये खेळण्यास पात्र ठरला.
सामन्यात शनिवारी एकेरीच्या लढतींनंतर १-१ अशी बरोबरी राहिली होती. दुसऱ्या दिवशी सर्व प्रथम रोहन बोपण्णा-युकी भाम्ब्री जोडी कोर्टवर उतरली. बोपण्णा-भाम्ब्री जोडीने मोरोक्कोच्या एलिएट बेंचेट्रिट-युनेस लालामी लारौसी जोडीचा ६-२, ६-१ असा पराभव केला. ही लढत १ तास ११ मिनिटे चालली होती. सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय जोडीने वर्चस्व राखताना मोरोक्कोला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुहेरीची लढत जिंकून भारताने आघाडी घेतली. परतीच्या पहिल्याच लढतीत सुमितने मोरोक्कोच्या यासिनी दिल्मीचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. सुमितच्या विजयानंतर संघ व्यवस्थापनाने दिग्विजयला पदार्पणाची संधी दिली. दिग्विजयने १ तास ४८ मिनिटांनंतर मोरोक्कोच्या अहौदा वालिदचा ६-१, ५-७, १०-६ असा पराभव केला.